सारडा महाविद्यालयावर जमावाची दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:15 AM2021-01-03T04:15:11+5:302021-01-03T04:15:11+5:30
धार्मिक स्थळाचे वादग्रस्त बांधकाम : संस्थेकडून पोलिसांत तक्रार अंजनगाव सुर्जी : शहरातील सारडा शिक्षण संस्थेच्या मालकीच्या जागेत असलेल्या महाविद्यालयाच्या ...
धार्मिक स्थळाचे वादग्रस्त बांधकाम : संस्थेकडून पोलिसांत तक्रार
अंजनगाव सुर्जी : शहरातील सारडा शिक्षण संस्थेच्या मालकीच्या जागेत असलेल्या महाविद्यालयाच्या इमारतीवर अज्ञात जमावाने शुक्रवारी दुपारी चार ते साडेचारच्या सुमारास तुफान दगडफेक केली. घटनेची तक्रार महाविद्यालयाच्या अधीक्षकांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. शहानूर नदीच्या दिशेने असलेल्या जुना हंतोडा शेतरस्त्याकडून ही दगडफेक करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या विज्ञान महाविद्यालयाच्या बिल्डिंगपासून अंदाजे शंभर फुटांवर एका धार्मिक स्थळाचे ओटा बांधकाम नाताळच्या सुट्यांमध्ये करण्यात आले. ही घटना महाविद्यालयाच्या सीसीटीव्ही चित्रीत झाली. अंदाजे शंभर जणांच्या जमावाने आठवड्यापासून या जागेत आपली सतत उपस्थिती दर्शविली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस प्रशासनाने जमावाच्या म्होरक्यावर प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावली. या जागेवर गस्त वाढविली आहे.
शहराच्या संवेदनशील घटनांचा इतिहास पाहता, उच्च पातळीवर या घटनेची दखल घेण्यात आली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेच्या माध्यमातून शहराची शांतता धोक्यात येऊ नये म्हणून दक्षतेने समाजकंटकांचा शोध घेणे सुरू केले आहे.
दरम्यान, शनिवारी दुपारी तहसील कार्यालयात महाविद्यालय प्रशासन व धार्मिक स्थळांशी संबंधित लोकांना बोलावून त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगण्यात आल्या व शक्यतो आपसी सहमतीने तोडगा काढण्यास सांगण्यात आले. स्थळाशी संबंधित लोकांनी नगर परिषदेमार्फत एका खासगी संस्थेने केलेले मोजमाप सर्वेक्षणात दाखविले. यानुसार सन २०१५ ची उल्लेखित कागदपत्रे दाव्यासाठी पुढे केली आहेत.
धार्मिक स्थळाचा महसुली पुरावा नाही
सात-बाराच्या रेकॉर्डनुसार संपूर्ण जागा सारडा संस्थेच्या मालकीची आहे. या जागेवर धार्मिक स्थळ अथवा बांधकाम असल्याचा कुठे महसुली पुरावा नाही. आमच्या जागेवर अतिक्रमण करणे चालू आहे. आम्ही कायदा-सुव्यवस्था राखण्यास वचनबद्ध आहोत.
डॉ. अमर सारडा, सचिव, सारडा शिक्षण संस्था
कोट २
स्थानिक पोलिस ठाण्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक कायद्यान्वये कारवाई केली आहे. महाविद्यालयाच्या परवानगीशिवाय आणि मुख्य प्रवेशद्वाराशिवाय या जागेवर कुणीही प्रवेश करू नये. स्थळाशी संबंधित जर काही कागदपत्रे असतील, तर त्यांच्या आधारे न्यायालयातून योग्य ते आदेश आणावेत, अशी सूचना अतिक्रमितांना केली आहे.
- सुनील मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी