मेळघाटात आजारी बालकाच्या पोटावर गरम विळ्याचे 'डंबे'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 07:00 AM2020-09-03T07:00:00+5:302020-09-03T07:00:07+5:30
पोटफुगीवर उपचार म्हणून दोन वर्षीय चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके दिल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी चिखलदरा तालुक्यातील लवादा या गावात उघडकीस आला.
नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पोटफुगीवर उपचार म्हणून दोन वर्षीय चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके दिल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी चिखलदरा तालुक्यातील लवादा या गावात उघडकीस आला. या घटनेमुळे मेळघाटात अंधश्रद्धेचा पगडा अजूनही घट्ट असल्याचे दिसून आले. दोन महिन्यंतील ही चौथी घटना आहे. दुसरीकडे सकाळपासून विविध वृत्तवाहिन्यांनी त्या बालकाचा मृत्यू झाल्याच्या दशाभूल करणारे वृत्त प्रसारित केल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.
दिवेश राजू अखंडे (२ वर्षे, रा.लवादा) असे या चिमुकल्याचे नाव असून, त्याला २५ किलोमीटर अंतरावरील सेमाडोह येथील भूमकाने गरम विळ्याचे चटके दिल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत पुढे आली. यासंदर्भात आरोग्य विभागातर्फे पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. बालकाला डंबे दिल्यानंतर गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांनी अचलपूर उपजिल्हा रुग्णालय व तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी लोकमतशी बोलताना दिली.
अघोरी प्रथेचा पगडा भारी
जून महिन्यात तीन मुलांच्या पोटावर गरम विळ्याने पोटावर डंबा देण्यात आल्याचा प्रकार लोकमतने उघड केला होता. त्यानंतर पुन्हा ही अघोरी प्रथा मेळघाटात सुरूच आहे. अंधश्रद्धेतून पोटफुगीवर हे डंबे दिले गेले. तालुक्यातील बिहाली उपकेंद्रांतर्गत असलेल्या लवादा गावातील या दोन वर्षांच्या चिमुकल्याला रुग्णालयात नेण्याऐवजी सेमाडोह येथे भूमकाकडे पोटावर गरम चटके (डंबा) देण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी सतीश प्रधान यांनी दिली. यासंदर्भात पोलिसांत तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर मृत्यूच्या बातम्या
पोटावर डंबे दिलेल्या त्या दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या विविध वृत्तवाहिन्यांनी सकाळपासून झळकल्या. सोशल मीडियावर त्या मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आल्या. प्रत्यक्षात लोकमतने माहिती घेतली असता, तो चिमुकला सुस्थितीत जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या पालकांनी नागपूरला जाण्यास नकार दिल्याने येथेच त्याच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले.
बालकावर जिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत. त्याचे आई-वडील तेथे आहेत. सेमाडोह येथे भूमकाकडे जाऊन डंबे घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यावरून शोध घेऊन पोलिसांत तक्रार देण्याची तयारी सुरू आहे.
- सतीश प्रधान
तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा