एक कोटी रुपयांचा चुराडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 01:12 AM2018-08-17T01:12:25+5:302018-08-17T01:13:09+5:30
डेंग्यूच्या राक्षसाच्या पायांचे ठसे दिसूनही त्याकडे महापालिका आयुक्तांनी आश्चर्यकारक दुर्लक्ष केल्यामुळे या बकासुराने अमरावती महानगरातील चिमुकल्यांचा अन् मोठ्यांचाही घास घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत चार जणांना या राक्षसाने गिळंकृत केले आहे.
डेंग्यूच्या राक्षसाच्या पायांचे ठसे दिसूनही त्याकडे महापालिका आयुक्तांनी आश्चर्यकारक दुर्लक्ष केल्यामुळे या बकासुराने अमरावती महानगरातील चिमुकल्यांचा अन् मोठ्यांचाही घास घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत चार जणांना या राक्षसाने गिळंकृत केले आहे.
डेंग्यू तसा जीवघेणा आजार असला तरी सहज नियंत्रणात आणता येऊ शकेल इतका तो मानवी मर्यादेत आहे. डेंग्यूचा फैलाव करणारे माध्यम म्हणजे स्वच्छ पाण्यावर आढळणारे डास. सकाळी सक्रिय होणारे हे डास नियंत्रणात आणणे हा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय. त्यानंतरही डेंग्यू झालाच, तर वैद्यकीय चिकित्सकाच्या देखरेखीत तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.
महापालिका आयुक्तपदाच्या अधिकाऱ्याने प्रशासन कौशल्य वापरून वेळोवेळी योग्य ते आदेश देणे आणि आदेशांचे पालन झाले की नाही, याची खातरजमा करणे इतकेदेखील काम न चुकता रोज केले तरी डासांवर नियंत्रण मिळविणे आणि डेंग्यूरूपी राक्षसाचा नायनाट करणे शक्य आहे. तथापि, आयुक्त संजय निपाणे यांनी गरजेपेक्षा जास्त सोज्वळपणा दाखविल्याने त्यांचे हे प्रशासकीय वागणे आता अमरावतीकरांच्या प्राणांवर बेतू लागले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे भारत दौºयावर असताना त्यांच्या वास्तव्यादरम्यान येथील प्रदूषणाने त्यांचे तीन दिवसांचे आयुष्य कमी झाल्याचा निष्कर्ष काढण्याइतपत आरोग्यक्षेत्र विकसित झाले आहे. इकडे केवळ डासांची पैदास न रोखल्यामुळे महानगरातील लोक पटापट मरून पडले. किमान एक कोटी रुपयांचे आणि २८ हजार मनुष्यदिवसांचा चुराडा असे राष्ट्राचे नुकसान झाले. लक्षावधी लोकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणाºया पदावर विराजमान प्रमुख अधिकारी संवेदनशील आणि निर्णयक्षम असल्यास सामान्यजनांना त्याचा लाभ आणि निर्णयक्षमता नसलेला असल्यास त्याचा तोटा किती, या दोन्ही बाबी यातून स्पष्ट व्हाव्यात.
शहरात किमान हजार स्त्री-पुरुषांना डेंग्यूची लागण झाली. महापालिका, शासन आकडे लपवित असली तरी 'लोकमत'ने शोधमोहीम राबवून शहरातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चेअंती हा आकडा मिळविला आहे. खरे तर डॉक्टरांच्या मते हा आकडा याहीपेक्षा बराच जास्त आहे. तथापि, बाधितांची किमान संख्या केवळ हजारच गृहीत धरली तरी प्रत्येक रुग्णाला औषधी, चाचण्या, इस्पितळाचे, डॉक्टरांचे शुल्क असा कमीत कमी १० हजार रुपये खर्च येतो. हजार लोकांसाठी एक कोटी रुपये व्यर्थ गेलेत. डेंग्यूबाधित रुग्णाला किमान १४ दिवस विश्रांती घ्यावीच लागते. याप्रमाणे हजार रुग्णांचे १४ हजार दिवस आणि देखभालीसाठी असलेली एका रुग्णामागे एक व्यक्ती याप्रमाणे हजार रुग्णांमागे हजार व्यक्तींचे १४ हजार दिवस असे एकूण २८ हजार मनुष्यदिवस असे राष्ट्राचे नुकसान झाले. हजारपैकी गंभीर रुग्णांची आकडेवारी पाच टक्के इतकी आहे.