घनकचरा ‘अ’ व्यवस्थापनाने शहर गारद !
By admin | Published: May 6, 2017 12:07 AM2017-05-06T00:07:19+5:302017-05-06T00:07:19+5:30
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गुरुवारी देशातील ४३४ स्वच्छ शहरांची क्रमवारी घोषित करण्यात आली.
स्वच्छ सर्वेक्षण - २०१७ : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रखडल्याने नामुष्की
प्रदीप भाकरे । लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गुरुवारी देशातील ४३४ स्वच्छ शहरांची क्रमवारी घोषित करण्यात आली. यात मध्यप्रदेशातील इंदूर, भोपाळने अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावला. ४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत क्वालिटी काऊंसिल आॅफ इंडियाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०१७ राबविण्यात आले. त्यापैकी ४३४ स्वच्छ शहरांची यादी गुरुवारी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी घोषित केली. या स्वच्छ शहरांच्या यादीत ‘आपले अमरावती’शहर तब्बल २३१ व्या क्रमांकावर आले. राज्यातील नवी मुंबई वगळता इतर शहरांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. अमरावती शहर तर घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प आणि अंमलबजावणी करू न शकल्याने स्वच्छ सर्वेक्षणात गारद झाले.
केंदी्रय नगरविकास मंत्रालयाच्या वतीने क्वालिटी काऊंसिल आॅफ इंडियाने हे सर्वेक्षण केले. एकूण २ हजारांपैकी गुण देऊन सर्वेक्षण केलेल्या शहरांची क्रमवारी ठरविण्यात आली.यापैकी ९०० गुण स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या कामकाजाला ,५०० गुण केंद्राच्या स्वच्छता पथकाने केलेल्या निरिक्षणास आणि ६०० गुण नागरिकांनी स्वच्छतेवर दिलेल्या प्रतिक्रियांना ठेवण्यात आले होते. घनकचरा व्यवस्थापनासाठी यात ४०० गुण ठेवण्यात आले होते. संकलित केलेल्या घनकचऱ्यावर करण्यात येणारी प्रक्रिया आणि विल्हेवाट असे घटक त्यात अंतर्भूत होते.क्युसिआयच्या पथकाने घनकचरा व्यस्थापन प्रकल्पाबाबत विचारणाही केली होती. मात्र हा प्रकल्प गर्भातच गारद झाला.किमानपक्षी कार्यारंभ आदेश दिल्या गेले असते तर ४०० पैकी ३०० च्या आसपास गुण मिळविणे शक्य होते. मात्र हा घनकचरा व्यवस्थापनाबाबत महापालिका बॅकफुटवर आल्याने हे गुण शहर मिळवू शकले नाही. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचे गुण मिळाले असते तर शहराच्या गुणांकनात वाढ होऊ शकली असती.मात्र तसे होऊ शकले नाही.
याशिवाय १७ ते १९ जानेवारी दरम्यान करण्यात आलेल्या क्युुसीआयच्या तपासणीदरम्यान वैयक्तिक तथा सामुदायिक शौचालयाची उभारणी अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेली नव्हती. सर्वेक्षणादरम्यान महापालिकेने राबविलेल्या स्वच्छताविषयक कामकाजासह सार्वजनिक स्थळावरच्या अस्वच्छतेची आवर्जून दखल घेण्यात आली. घराघरांतून कचरा संकलनाची प्रक्रिया महापालिकेकडून करण्यात येत असली तरी तो कचरा कंटेनर आणि त्या भोवताल इतस्तत: पसरत असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.स्वच्छ सर्वेक्षणात नापास झाल्यानंतर का होईना महापालिकेने स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.