गुन्हेगारीवर अंकुश लावा, अन्यथा कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:01 PM2018-07-21T23:01:08+5:302018-07-21T23:01:39+5:30
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील विविध ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी रात्रकालीन गस्तीत सर्चिंग आॅपरेशन सुरू केले. शहरात नुकत्याच घडलेल्या दोन हत्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांनी सर्व ठाण्यांना सक्त निर्देश दिले आहेत. गुन्हेगारीवर अंकुश लावा, अन्यथा मोठी अॅक्शन घेईन, अशी तंबी आयुक्तांनी ठाणेदारांना दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील विविध ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी रात्रकालीन गस्तीत सर्चिंग आॅपरेशन सुरू केले. शहरात नुकत्याच घडलेल्या दोन हत्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांनी सर्व ठाण्यांना सक्त निर्देश दिले आहेत. गुन्हेगारीवर अंकुश लावा, अन्यथा मोठी अॅक्शन घेईन, अशी तंबी आयुक्तांनी ठाणेदारांना दिली आहे.
गुन्हेगारीवर अंकुश लावण्याचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांनी स्वत:ही 'आॅल आऊट' आॅपरेशन राबवून शहरात पोलिसी खाक्याचा दबदबा निर्माण केला. त्यानंतर काही दिवस गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, आता पुन्हा गुन्हेगारीने तोंड वर काढले असून, आयुक्तांच्या अधिनस्थ यंत्रणा पुन्हा पूर्वीच्या खाक्याने काम करीत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास येत आहे. त्यातच आयुक्तालय हद्दीत घडलेले दुहेरी हत्याकांड व पाठोपाठच सातुर्णा येथील युवकाच्या हत्येने पुन्हा अमरावतीकरांच्या मनात धडकी भरली आहे. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी रात्रीच्या सुमारास गस्त लावण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. शुक्रवारी पोलिसांनी शहरातील हॉटेल, लॉज, धाब्यासह पानटपरी, अंडा सेंटर, चायनिज हातगाड्यांची झडती घेतली. संशयितांची विचारपूस करून त्यांची अंगझडतीसुद्धा घेतली. रात्री १० ते १२ दरम्यान विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हे सर्च आॅपरेशन राबविले. यादरम्यान पोलिसांनी अनेकांवर कारवाईचा केली. मर्यादेपेक्षा अधिक वेळ व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांवर बडगा उगारण्यात आला. राजापेठ हद्दीत १२ जणांवर कारवाई करण्यात आली असून, गाडगेनगर हद्दीतसुद्धा काही संशयिताची कसून चौकशी करण्यात आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता, शहरातील रात्रीच्या वेळेत अनेक गुंड प्रवृत्तीचे तरुण फिरताना आढळून येतात. बारमध्ये मद्यप्राशन करून बाहेर आल्यानंतर धिंगाणा घालतात. अशाप्रसंगी वाद होऊन मोठ्या घटना घडण्याची शक्यता असतो. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी दररोज नाइट राऊंड घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांवर वॉच ठेवावा, असे निर्देश पोलीस आयुक्तांना ठाणेदारांना दिले आहेत. पोलिसांच्या झाडाझडतीने अनेकांचे धाबे दणाणणे होते.
रात्रीच्या वेळेत गस्त लावून गुन्हेगारी प्रवृत्तीवर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी योग्य रीतीने काम न केल्यास त्यांच्यावर मोठी अॅक्शनसुद्धा घेण्यात येईल.
- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.