अमरावती जिल्ह्यात दर शनिवार, रविवारी कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 12:41 PM2021-02-19T12:41:28+5:302021-02-19T12:50:28+5:30
Amravati News दोन आठवड्यांपासून रोज विस्फोट करणा-या कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात दर शनिवारी व रविवारी कर्फ्यूचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी जारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दोन आठवड्यांपासून रोज विस्फोट करणा-या कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात दर शनिवारी व रविवारी कर्फ्यूचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी जारी केले. या संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवांना सकाळी ६ ते १० पर्यंत मुभा देण्यात आली तर सर्व वैद्यकीय सेवा कर्फ्यूमध्येही सुरू राहतील.
या संचारबंदीच्या काळात अमरावती शहर व ग्रामीण भागातील सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठांमधील दुकाने, मॉल्स, मार्केट, कॉम्प्लेक्स बंद राहतील. याशिवाय चहा, नाष्टा प्रतिष्ठाने पानटपरी व इतर जीवनावश्यक वस्तूंची विक्री या कालकावधीत बंद राहतील. फक्त दूध, भाजीपाला विक्री सकाळी ६ ते १० या कालावधीत सुरू राहील. हॉटेल, बार रेस्टारंट या कालावधीत बंद राहतील.
जिल्ह्यातील नागरिकांनी पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित जमा होऊ नये, अनावश्यक कारणाशिवाय कोणत्याही नागरिकांनी शहरात व गावात शिरू नये, पोलीस विभागाने या संचारबंदीच्या काळात जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांकरिता नाकेबंदी करून तपासणी करावी व अनावश्यक वाहतूक करणा-यांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
या आदेशाचा भंग करणा-या कोणत्याही व्यक्तीने भादंवीचे १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षाप्राप्त अपराध केल्याचे मानून त्यांच्यावर सदर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल व याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थाचे अधिकारी व कर्मचार्यांना प्राधिकृत करण्यात आल्याचे जिल्हाधिका-यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
या सेवांना संचारबंदीच्या कालावधीत मुभा
* सर्व दुध डेअरी सकाळी ६ ते १० पर्यंत सुरू
* सर्व मेडिकल, हॉस्पिटल, नर्सिंग होम, लॅब, अॅम्बूलन्स सुरू
* एमआयडीसीअंतर्गत सर्व औद्योगिक आस्थापना सुरू राहतील
* वीज वितरण कंपनी अंतर्गत वीज सेवा, मजीप्रा अंतर्गत पुरवठा सुरू राहील
* गॅस सेवा, रोड दुरुस्ती, नाले सफाई सुरू राहील
* जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप नियमित सुरू राहतील.
संचारबंदीत या सेवांना मनाई
* जिल्ह्यातील सर्व बाजारपेठ, मॉल्स, चहा-नासत प्रतिष्ठाने बंद
* हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार बंद
* ट्रॅव्हल्स, खासगी बसेस, खासगी वाहतूक, एस व महापालिकेची बससेवा बंद
* जीवनावश्यक वस्तूच्या वाहतुकीची सेवा सुरू राहील अशी वाहतूक करणारे वाहने यातून वगळली.
* जिम, व्यायामशाळा, जलतरण तलाव, थिएटर, सिनेमागृहे या काळात बंद राहतील
* वाचनालये, आठवडी बाजार, गुरांचे बाजार, बांधकामे, गॅरेज, सलून, ब्यूटी पार्लर बंद राहतील.
पर्यटनस्थळ राहणार बंद
संचारबंदीच्या कालावधीत पर्यटन स्थळे, उद्याने, बगीचे पार्क, बांबू गार्डन, वडाळी, मेळघाट सफारी आदी बंद राहणार आहे. येथे नागरिकांनी गर्दी केल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
बँका, पतसंस्था बंद
या संचारबंदीच्या काळात सर्व राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, सहकारी संस्था, पतपेढी संस्था व सर्व वित्तीय संस्था या काळात बंद राहतील. याशिवात विनाकारण दुचाकी किंवा चारचाकीवर फिरताना आढळल्यास दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाईल.