अमरावतीत संचारबंदी, तणावपूर्ण शांतता; चार दिवस इंटरनेट बंद; दोन अधिकाऱ्यांसह चार पोलीस जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 08:02 PM2021-11-13T20:02:17+5:302021-11-13T20:03:09+5:30
Amravati News भाजपने शनिवारी पुकारलेल्या अमरावती बंदला हिंसक वळण मिळाले. खबरदारी म्हणून तडकाफडकी संचारबंदी लागू करण्यात आली असून शनिवारी संध्याकाळपासून मंगळवार १६ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंद ठेवण्यात आले आहे.
अमरावती : त्रिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी एका समुदायाने पुकारलेल्या बंददरम्यान प्रचंड दगडफेक झाल्याने त्याचा निषेध म्हणून भाजपने शनिवारी पुकारलेल्या अमरावती बंदला हिंसक वळण मिळाले. खबरदारी म्हणून तडकाफडकी संचारबंदी लागू करण्यात आली असून समाजमाध्यमांवर अफवा आणि गैरसमज पसरविण्याला अटकाव करण्यासाठी शनिवारी संध्याकाळपासून मंगळवार १६ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंद ठेवण्यात आले आहे. जमावाने केलेल्या दगडफेकीत दोन पोलीस अधिकाऱ्यांसह चार पोलीस जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नागपूर, अकोला, यवतमाळ, वाशिम येथून पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली. संध्याकाळी स्थिती नियंत्रणात आली असली तरी तणावपूर्ण शांतता आहे.
बंददरम्यान, टांगा पाडाव चौक ते चांदणी चौक, छत्रसाल खिडकी परिसरादरम्यान दोन्ही समुदाय समोरासमोर उभे ठाकले. एक जमाव पोलिसांच्या अंगावर चालून आला, तर त्याच भागातील एका धार्मिक स्थळाची नासधूस करण्यात आली. त्यामुळे भडका उडाला. शहर पोलिसांनी जमावावर रबरी बुलेटचा मारा केला. अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही दगडफेक सुरूच होती. तलवार, सत्तूर फिरविण्यात आले. त्यामुळे लाठीचार्जदेखील करण्यात आला. दुपारी २ ते ४ दरम्यान जीवघेणा थरार सुरू होता.
बंददरम्यान उफाळलेल्या हिंसाचारादरम्यान गुन्हे शाखेचे निरीक्षक अर्जुन ठोसरे तसेच एका पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलीस जखमी झाले. शहरात प्रचंड जाळपोळ, दगडफेक, नासधूस करण्यात आल्याने अराजक माजले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नागपूर, अकोला, यवतमाळ, वाशिम येथून अतिरिक्त पोलीस तसेच अमरावती एसआरपीएफच्या पाच तर नागपूरहून दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.पार्श्वभूमीवर प्रभारी शहर पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी शहर आयुक्तालय क्षेत्रात १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू केली. मात्र, शनिवारी रात्री शहरातील विशिष्ट भागात कशा प्रतिक्रिया उमटतात, त्यावर संचारबंदीचा कालावधी ठरणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, राज्याचे अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिंह नागपूरहून अमरावतीत दाखल झाले.
वाहने जाळली, दुकान, गॅरेजला लावली आग
बंद दरम्यान शहराचे हृदयस्थान असलेल्या राजकमल चौकातून निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी दगडफेक करीत काही दुकानांना लक्ष्य केले. तोडफोड व जाळपोळही केली. मोर्चेकऱ्यांवर वज्र वाहनातून पाण्याचा मारा करण्यात आला. शुक्रवारच्या तणावामुळे शहरात काही तरी अघटित घडणार, अशी अटकळ बांधली जात होती. ही भीती खरी ठरली. बंदच्या अनुषंगाने अमरावती शहरातील बहुतांश दुकाने शनिवारी उघडलीच नाही. नमुना भागात कार जाळण्यात आली, तर ऑटोगल्ली व हमालपुरा भागातील मोटर गॅरेजमधील चार दुचाकी जाळण्यात आल्या. नमुना भागातील एक इंजिनिअरिंग वर्कशॉप जाळण्यात आले. नमुना, राजापेठ, अंबापेठ, साबणपुरा, इतवारा बाजार, चित्रा चौक, राजकमल चौक, चांदणी चौक भागात सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
युवकाचा पंजा फाटला
पोलिसांनी जमावाच्या दिशेने सोडलेले अश्रुधुराचे नळकांडे मोर्चेकऱ्यांपैकी एकाने झेलले. ते त्याच्या हातातच फुटले. त्याचा हाताचा संपूर्ण पंजा फाटला. राजकमल चौकात हा प्रकार घडला. तर टांगापाडाव चौकापुढे उडालेल्या धुमश्चक्रीदरम्यान सहापेक्षा अधिक आंदोलक जखमी झाले. नागपुरी गेट ठाण्यातील पोलीस कर्मचारीदेखील यादरम्यान जखमी झाला. वृत्त लिहिस्तोवर राजापेठ, कोतवाली, नागपुरीगेट, गाडगेनगर पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.