अमरावतीतील संचारबंदी २१ नोव्हेंबरपर्यंत; गुरुवारपासून इंटरनेट बंदीचा आदेश मागे घेण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 09:40 PM2021-11-16T21:40:39+5:302021-11-16T21:41:30+5:30
Amravati News अमरावतीत शनिवार, दि. १३ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आलेली संचारबंदी उठविण्याबाबत सोमवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी निर्णय घेतला जाणार आहे.
अमरावती : अमरावतीत शनिवार, दि. १३ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आलेली संचारबंदी उठविण्याबाबत सोमवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी निर्णय घेतला जाणार आहे. शहराची परिस्थिती पाहून तो निर्णय स्थानिक स्तरावर घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अपर पोलीस महासंचालक राजेंदर सिंग यांनी दिली आहे. मात्र, तोपर्यंत संचारबंदीत रोज २ ते ३ तास अशी शिथिलता देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सध्यातरी २१ नाेव्हेंबरपर्यंत संचारबंदी असल्याचे स्पष्ट झाले.
१२ नोव्हेंबर रोजी निघालेल्या मोर्चादरम्यान करण्यात आलेली नासधूस, तोडफोडीचा निषेध म्हणून १३ रोजी भाजपकडून बंद पुकारण्यात आला. त्यादरम्यान शहरातील विविध ठिकाणी तोडफोड व लूटपाट करण्यात आली. परिणामी प्रभारी पोलीस आयुक्तांकडून संचारबंदी लागू करण्यात आली. त्याअनुषंगाने अपर पोलीस महासंचालक राजेंदर सिंग यांनी शनिवारपासून शहरात मुक्काम ठोकला आहे. दोन्ही दिवसांतील घटनांच्या अनुषंगाने मंगळवारी त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. तर, इंटरनेट बंदीचा बुधवारी सायंकाळी आढावा घेतला जाणार आहे. गुरुवारपासून इंटरनेट बंदीचा आदेश मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे.