संचारबंदीत शिथिलता, मात्र, ११ च्या आत घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:12 AM2021-05-23T04:12:27+5:302021-05-23T04:12:27+5:30
अमरावती : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या कठोर संचारबंदीत १ जूनपर्यंत काही प्रमाणात शिथिलता देण्यात आलेली आहे. ...
अमरावती : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या कठोर संचारबंदीत १ जूनपर्यंत काही प्रमाणात शिथिलता देण्यात आलेली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी जारी केले. यानुसार आता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहतील. याशिवाय घरपोच सेवादेखील देता येणार आहे.
या आदेशानुसार किराणा, भाजीपाला, फळविक्रेते, दुधडेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य, पेय पदार्थ पीठ गिरणी, चष्म्याची दुकाने आदी दुकाने चिकन, मटन, पोल्ट्री, मासे, अंडी यासह दुग्ध विक्री केंद्र, दुग्धालय, दूध संकलन, दुध वितरण या वेळेत सुरू राहतील. या दुकांनासोबतच सर्व प्रकारची मद्यालये, मद्य दुकाने, बार ही दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
हॉटेल रेस्टाॅरंट, खानावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा याच कालावधीत सुरू राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. या ठिकाणी ग्राहक आढळून आल्यास कारवाई केली जाईल. संचारबंदीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व्यक्तीची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात येवून दंडात्मक व फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
बॉक्स
रेशन धान्य वितरणासाठी टोकन सिस्टीम
सर्व प्रकारची शासकीय धान्य दुकानांमध्ये वितरणास सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. संबंधित तहसीलदार व रेशन दुकानदार यांनी त्यांचे दुकानाचे लाभार्थी यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून धान्य वितरणासाठी टोकन सिस्टीमचा वापर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.