एसआरपीएफ कॅम्प वसाहतीत कर्फ्यूसदृश स्थिती
By Admin | Published: March 28, 2015 12:04 AM2015-03-28T00:04:14+5:302015-03-28T00:04:14+5:30
येथील चांदूररेल्वे मार्गावरील राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) कॅम्प वसाहतीत बिबट्याच्या
अमरावती : येथील चांदूररेल्वे मार्गावरील राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) कॅम्प वसाहतीत बिबट्याच्या दहशतीने कर्फ्यूसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सायंकाळी सहा वाजतानंतर वसाहतीमधील घरांचे दरवाजे, खिडक्या आपसूकच बंद होतात. मागील १५ दिवसांपासून हा प्रकार सुरु असून १२०० कुटुंब दहशतीत वावरत आहेत.
जातीय दंगल, संकटकालीन परिस्थिती, कर्फ्यू लागल्यास कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी एसआरपीएफचे जवान धावून येतात. मात्र, एसआरपीएफच्या जवानांना एका बिबट्याच्या दर्शनाने जेरीस आणून त्यांना दहशतीत जगण्यास भाग पाडल्याचे दिसून येत आहे.
मागील तीन ते चार महिन्यांपासून दक्षिण वडाळी बीटमधून एसआरपीएफ पाचशे क्वॉटर्सच्या श्रेष्ठता पार्कमधून बिबट व छाव्याचे दर्शन वसाहतीतील कर्मचाऱ्यांना होत आहे. या बिबट्याच्या दर्शनाने एसआरपीएफ क्वॉटर्समधील कर्र्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील नूर हरपला आहे. श्रेष्ठता पार्कमध्ये कर्मचारी लहान मुले कुटुंबीयांसह बागडण्याला जातात. परंतु बिबट्याच्या दहशतीने या संपूर्ण परिसरात हल्ली शुकशुकाट बघावयास मिळत आहे.
वनविभागाचे 'सर्च आॅपरेशन'
बिबट्याच्या शोधार्थ गुरुवारी मध्यरात्री वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी 'सर्च आॅपरेशन' राबविण्यात आले. रात्री अडीच वाजेपर्यंत चाललेल्या या मोहिमेत काहीही हाती लागले नाही. बिबट्याच्या येणाऱ्या प्रमुख मार्गावर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांच्या आदेशानुसार वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. के. लाकडे यांच्या मार्गदर्शनात वनपाल विजय बारद्धे, विनोद कोहळे, वनरक्षक बापुराव खैरकर, दिलीप पळसोदकर, अश्विन महल्ले, ठाकूर, अनुप साबळे, अमोल गावराने, इकबाल शेख, सतीश उमक, निरंजन राठोड आदींनी बिबट्याच्या शोधमोहिमेत रात्र घालवली. 'रेस्क्यू आॅपरेशन'ची चमू सोबत होती.