नव्या ‘करन्सी’ची उत्सुकता शमलीच नाही
By admin | Published: November 11, 2016 12:25 AM2016-11-11T00:25:27+5:302016-11-11T00:25:27+5:30
आरबीआयकडून अमरावती शहरातील बँकांना दुपारी ४ वाजेपर्यंत पाचशे रुपयांच्या नव्या नोटा प्राप्तच न झाल्याने नवीन ‘करन्सी’ कशी आहे,
दोन हजाराच्या एकाच नोटेचे वाटप : नोटा बदलून घेण्याकरिता बँकांमध्ये झुंबड, पोलीस बंदोबस्त तैनात
अमरावती: आरबीआयकडून अमरावती शहरातील बँकांना दुपारी ४ वाजेपर्यंत पाचशे रुपयांच्या नव्या नोटा प्राप्तच न झाल्याने नवीन ‘करन्सी’ कशी आहे, हे पाहण्यासाठी उत्सुक ग्राहकांची पुरती निराशा झाली. पाचशे रूपयांच्या नव्या नोटा शहरात दाखल झाल्या नसल्याचे एसबीआय व महाराष्ट्र बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर दोन हजारांच्या नव्या नोटा एसबीआयला मिळाल्या असतानाही एकाच खातेदाराला दोन हजाराची नवीन नोट मिळू शकली.
पतंप्रधान नरेंद्र मोदी सरकारने चलनातून हजार व पाचशे रुपयांच्या नोेटा बाद केल्याने कालपासून सगळे वातावरण ढवळून निघाले आहे. या नोटा बदलवून त्याऐवजी नव्या नोटा मिळविण्यासाठी गुरूवारी बँकांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली होती. सलग दोन दिवस एटीएम सेवाही बंद असल्याने नागरिकांनी जुन्या नोटा बदलविण्यासाठी व नवीन करन्सी मिळविण्यासाठी बँकामध्ये धाव घेतली. अमरावती शहरात राष्ट्रीयीकृत, को.-आॅप. मिळून एकूण ५७ बँका आहेत. याबँकाच्या जिल्हाभरात शेकडो शाखा आहेत. त्यामुळे यासर्व बँकामध्ये जुन्या नोटा स्वीकारणे सुरु होते. बँकांजवळ हजार-पाचशे व्यतिरिक्त शिल्लक असलेल्या शंभर , पन्नास व दहा रुपयांच्या नोटा ग्राहकांना वाटप करण्यात आल्या.
पोलीस बंदोबस्तात रुपयांचे वाटप
अमरावती : ग्राहकांना वाटप करण्यात आल्या. एका ओळखपत्रांवर फक्त चार हजार रुपयांची मर्यादा असल्याने ग्राहकांची रीघ लागली होती. आरबीआयच्या परिपत्रकानुसार जारी अर्ज व ओळखपत्रासह उपस्थित ग्राहकालाच नोटा बदलून दिल्या गेल्या. ग्राहकांची गर्दी लक्षात घेता कुठलीही अनुचित घटना किंवा गैरसौय होऊ नये, याकरीता सर्व बँकांसमोर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. पोलीस बंदोबस्तात पैशांचे वाटप यावेळी करण्यात आला. ज्या ग्राहकाचे बँकेत खाते आहे. त्या खातेदारांना एका दिवसात दहा हजार व आठवडयाभरात २० हजारांचे विड्रॉल करता येणार असल्याने त्याकरिताही नागरिकांनी धाव घेतली आहे. सकाळपासूनच अनेक नागरिकांनी, महिलांनी व वयोवृध्दांनी बँकेत गर्दी केली होती. दिव्यांगदेखील रांगेत ताटकळत उभे होते. (प्रतिनिधी)