दसरा सणापूर्वी सीताफळ बाजारपेठेत विक्रीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 05:00 AM2020-10-09T05:00:00+5:302020-10-09T05:00:02+5:30
यावर्षी पाऊस मुबलक प्रमाणात पडला असला तरीही संततधार पावसामुळे यंदा सीताफळाच्या झाडाला बहर कमी लागला आहे. अर्धेअधिक फळे गळून पडली आहेत. यंदा ऑगस्टमध्ये महिनाभर पाऊस पडल्यामुळे सीताफळ यावर्षी कमी असले तरी पिकण्याच्या स्थितीत आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : दसरा सण सुरू होण्यापूर्वी यावर्षी बाजारपेठेत सीताफळे विक्रीला आली आहेत. या नव्हाळीकडे आकर्षित होऊन फळे खरेदीसाठी ग्राहकांचा कल वाढत आहे.
यावर्षी पाऊस मुबलक प्रमाणात पडला असला तरीही संततधार पावसामुळे यंदा सीताफळाच्या झाडाला बहर कमी लागला आहे. अर्धेअधिक फळे गळून पडली आहेत. यंदा ऑगस्टमध्ये महिनाभर पाऊस पडल्यामुळे सीताफळ यावर्षी कमी असले तरी पिकण्याच्या स्थितीत आले आहे. त्यामुळे बाजारपेठेत सीताफळ विक्रीला लवकर आले असून, २५० ते ३०० रुपये डझनप्रमाणे बाजारपेठेत विक्री होत आहे. त्यामुळे वनव्याप्त भागातील ग्रामस्थांना सीताफळापासून रोजगार मिळत आहे.
सीताफळ हे आरोग्यदायी असल्याने तसेच वर्षाला एकदाच मिळत असल्याने ग्राहक त्याकडे आकर्षित होत आहेत. सीताफळाच्या झाडाला दरवर्षी जून महिन्यात, तर कधी कधी मे महिन्यातही कळ्या येत असतात. सप्टेंबर ते आॅक्टोबर या महिन्यात फळे परिपक्व होतात. परंतु, यावर्षी अधिक महिना आल्याने सर्व सण एक महिना पुढे गेले आहेत. त्यातच आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने सतत हजेरी लावली. त्यामुळे सीताफळ हे लवकरच परिपक्व झाले आहे.
हिरवीगार दिसणारी फळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असल्यामुळे सीताफळाची विक्री जोरात सुरू झाली आहे. हिरवीगार व परिपक्व सीताफळांची बाजारपेठांत एंट्री झाली आहे. चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा, काजळी, बहिरम, ब्राम्हणवाडा थडी, घाटलाडकी, शिराजगाव कसबा या परिसरात सीताफळांच्या मोठ्या बागा आहेत. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना सीताफळापासून मोठा रोजगार मिळत आहे. या भागातील सीताफळे गोड, लज्जतदार असतात. यामुळे या भागातील सीताफळाची मागणीसुद्धा अधिक असते.