सिलिंडरच्या टंचाईमुळे ग्राहक त्रस्त

By admin | Published: September 3, 2015 12:07 AM2015-09-03T00:07:10+5:302015-09-03T00:07:10+5:30

सणासुदीच्या काळात तालुक्यात निर्माण झालेल्या गॅस सिलिंडरच्या कृत्रिम टंचाईमुळे ग्राहकांची प्रचंड अडचण होत आहे.

Customers suffer due to shortage of cylinders | सिलिंडरच्या टंचाईमुळे ग्राहक त्रस्त

सिलिंडरच्या टंचाईमुळे ग्राहक त्रस्त

Next

एकच एजन्सी : ग्राहकांची सर्रास पिळवणूक
चांदूरबाजार : सणासुदीच्या काळात तालुक्यात निर्माण झालेल्या गॅस सिलिंडरच्या कृत्रिम टंचाईमुळे ग्राहकांची प्रचंड अडचण होत आहे. ग्राहकामध्ये असंतोषाचे वातावरण दिसत आहे. ग्राहकांना सिलिंडर घेण्याकरिता सकाळपासूनच एजन्सीपुढे रांगेत उभे राहावे लागत आहे.
चांदूरबाजार तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांच्या जवळपास असून तालुक्यात एकमेव गॅस एजन्सी आहे. या एजन्सीमधून दररोज ७०० ते ७५० ग्राहक सिलिंडरची उचल करतात. गॅस एजन्सीकडे सिलिंडरची आवक व ग्राहकांची रोजची मागणी याचा ताळमेळ बसत नसल्यामुळे गॅस सिलिंडरधारकांना नाहकच कृत्रिम टंचाईचा सामना करावा लागत आहे. याचा फटका तालुक्यातील अंदाजे २० हजार ग्राहकांना बसत आहे.
या गॅस एजन्सी अंतर्गत चांदूरबाजार शहरासह बेलोरा, घाटलाडकी, ब्राह्मणवाडा थडी, आसेगाव, शिरजगाव बंड या मोठ्या गावांसह तालुक्यातील अनेक लहान -मोठी गावे येतात. परंतु तालुक्यात गॅसची एकमेव एजन्सी असल्यामुळे गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यामध्ये सदैव अनियमितता असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे तालुक्यात दुसरी एक गॅस एजन्सी असावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. अनेक वर्षांपासून महसूल विभागाकडे त्रस्त गॅसधारकांनी अनेक वेळा लेखी तक्रारी केल्या आहेत. परंतु पुरवठा विभागाने या तक्रारींची दखल न घेतल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पुरवठा विभागाने दुसऱ्या एजन्सीचा प्रस्ताव तातडीने प्रशासनाकडे मांडायला हवा.
अधिक पैसे घेऊन दिले जाते सिलिंडर
तालुक्यातील या एकमेव गॅस एजन्सीमध्ये गॅस कनेक्शनसाठी अर्ज केल्यावर ४ ते ५ महिने कनेक्शन मिळत नाही. तसेच या कनेक्श्नचे अतिरिक्त पैसे घेऊन गॅस कनेक्शन देण्याच्या अनेक तक्रारी नागरिकांतर्फे केल्या जात आहेत. काही नागरिकांकडे गॅस कनेक्शन नसल्याने या ग्राहकांना अधिक पैसे दिल्यावर त्वरीत सिलिंडर उपलब्ध करून दिले जाते, अशा अनेक तक्रारी परिसरातील गॅस सिलिंडरधारकांकडून केल्या जात आहेत.

Web Title: Customers suffer due to shortage of cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.