डायलिसीससाठी तो करतो सायबर क्राईम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:46 AM2019-05-04T00:46:07+5:302019-05-04T00:46:26+5:30
पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी करून शहरातील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला गंडा घालणाऱ्या एका आरोपीचा सायबर पोलीस शोध घेत आहेत. तो आरोपी डायलिसीससाठी पैसे नसल्याने सायबर क्राईम करतो. इतकेच नव्हे तर अटक झाल्यानंतर शासकीय आरोग्य यंत्रणेकडून उपचार करून घेतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी करून शहरातील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला गंडा घालणाऱ्या एका आरोपीचा सायबर पोलीस शोध घेत आहेत. तो आरोपी डायलिसीससाठी पैसे नसल्याने सायबर क्राईम करतो. इतकेच नव्हे तर अटक झाल्यानंतर शासकीय आरोग्य यंत्रणेकडून उपचार करून घेतो. या पसार आरोपीला सायबर पोलीस अटक करणार आहे.
पोलीस इन्सपेक्टर बोलतोय, असे सांगून रोशन दिलीप इंगळे (२९, रा. ज्योती कॉलनी) या टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला सात हजारांनी गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलिसांनी अमित कांबळे व विष्णू गिरी (दोन्ही रा. पुणे) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४१९, ४२०, ३४, सहकलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. ८ एप्रिल रोजी सायबर पोलिसांनी आरोपी विष्णू गिरीला अटक केली. तथापि, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अमित कांबळे हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याचा पूर्वेतिहास तपासल्यानंतर पोलीस चाट झाले.
अमित कांबळे हा किडनीच्या आजाराने ग्रस्त असून, तो उपचारासाठी सायबर गुन्हे करतो. डायलिसीससाठी पैसे नसल्यामुळे तो फेक कॉल करतो. वेगवेगळी बतावणी करून नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. एवढेच नव्हे तर स्वत:ला अटक करून घेतल्यानंतर पोलीस त्याला उपचारासाठी नेतात, त्याच्यावर सरकारी खर्चाने उपचार होतात, हा उद्देश ठेऊन अमित कांबळे गुन्हे करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
पुण्यात अनेक गुन्हे
पुणे शहरात अमित कांबळेविरुद्ध अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याविरुद्ध अलीबाग व अहमदनगर येथेही गुन्हे दाखल आहेत. शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करण्यात तो माहीर आहे. काही वर्षांपूर्वी एका पोलीस अधिकाºयाला वरिष्ठ असल्याचे फोनवर सांगत त्याने तुरुंगातील कैद्यांना हलविण्यासंदर्भात सांगितले होते. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली होती. अमरावतीमधील एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकालाही त्याने पोलीस इन्पेक्टर बोलत असल्याची बतावणी केली.
फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दुसºयालाही अटक केली जाईल. तो उपचारासाठीच असे गुन्हे करतो.
- कांचन पांडे, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर ठाणे