सिलिंडरचा स्फोट, आठ घरे बेचिराख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2016 12:02 AM2016-04-26T00:02:21+5:302016-04-26T00:02:21+5:30
येथील आठवडीबाजार परिसरातील आठ घरांना आग लागून राखरांगोळी झाली. सोमवारी सकाळी ११.१५ वाजता सिलिंडरचा स्फोटामुळे एका घराला आग लागली.
लाखोंची हानी : परतवाड्याच्या आठवडी बाजारातील घटना, महिलांचा आक्रोश
परतवाडा : येथील आठवडीबाजार परिसरातील आठ घरांना आग लागून राखरांगोळी झाली. सोमवारी सकाळी ११.१५ वाजता सिलिंडरचा स्फोटामुळे एका घराला आग लागली. त्यातील सिलिंडरचा स्पोट झाल्याने इतर घरांना आग लागली. दोन अग्निशमन दलाच्या बंबाने ही आग आटोक्यात आणली. संपूर्ण आयुष्याची पुंजी व संसार उद्ध्वस्त झाल्याने महिलांचा घटनास्थळी आक्रोश सुरू होता.
परतवाडा शहराच्या मध्यभागी असलेल्या शिवाजी प्रभाग आठवडी बाजारात सुनील उमरकर यांच्या घराला सर्वप्रथम आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. कुळामातीच्या या घराने शॉट सर्किटमुळे पेट घेताच घरातील कपडे, बिस्तरे व लाकडी साहित्य जळाले. त्यातच सिलिंडरचा स्पोट झाल्याने लागून असलेल्या इतर घरांना आगीने कवेत घेतले. तुळशीराम कदम, सुनीता भगवानसिंग मोरले, अनिल उमरकर, आकाश उमरकर, नानीबाई उमरकर, नंदू हटेल, संजय डोंगरे, मनोज नागले आदींच्या घरांची राखरांगोळी झाली. या आठ घरांमध्ये तब्बल ४३ सदस्य राहत होते. मात्र या आगीत कुठलीच जीवित हानी झाली नाही. शहरात सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या आठवडी बाजारात घरांना आग लागल्यावर सिलिंडरचा स्पोट होताच भाजी व मटन, चिकन विक्रेत्यांसह उपस्थित ग्राहकांनी मिळेल त्या रस्त्याने पळ काढला. आठवडी बाजारात स्मशान शांतता पसरली होती.
महिलांचा आक्रोश
आपल्या डोळ्यादेखत आयुष्याची पुंजी पूर्णत: राखरांगोळी झाल्याने महिला व मुलींनी एकच हंबरडा फोडला. घरातील काही सामान वाचविण्याचा आटोक्यात प्रयत्न केला. मात्र आग एवढी भीषण होत की काहीच त्या वाचवू शकल्या नाही. रोख रक्कम, सोन्याचे दागिने, कपडे, बिस्तरे, अन्न, धान्य आदी सर्व साहित्य आगीत जळून खाक झाले. आग लागताच घरातील लहान मुलांना प्रथम परिसरातील नागरिकांनी बाहेर काढल्याने अनर्थ टळला. घटनास्थळी अचलपूर नगरपरिषदेच्या दोन अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणली गेली. विद्युत कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला. घटनास्थळी अनिल तायडे, प्रदीप तायडे, राधे शर्मा, गणेश नंदवंशी, दीपक गणेशे, बापूराव धंदर, रुपेश लहाणे, सागर वाटाणे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली. ठाणेदार किरण वानखडे व तहसील प्रशासनाच्यावतीने पंचनामा करण्यात आला.
सावळी येथे एका घराची राखरांगोळी
परतवाडा शहराला लागून असलेल्या सावळी दातूरा येथे सोमवारी सकाळी १०.३० वाजता चिरोंजीलाल काचोळे यांच्या घराला आग लागून घरातील सर्व साहित्याची राखरांगोळी झाली. आग लागल्यानंतर अचलपूर येथील अग्निशमन यंत्राच्या साहाय्याने विझविण्यात आली. नागरिकांना आग दिसताच त्यांनी हातात मिळेल त्याने पाणी टाकून आग विझविली.