डाळींचा भडका, ग्राहकांना तडका
By admin | Published: April 24, 2017 12:49 AM2017-04-24T00:49:31+5:302017-04-24T00:49:31+5:30
उन्हाळ्यामुळे डाळींना मागणी वाढली आहे. वाळवणाचे विविध पदार्थ तयार करण्यासाठी गृहिणींकडून हरभरा, उडीद व मूंग डाळींना पसंती दिली जाते.
फटका : शेतमालाच्या तुलनेत डाळींचेच भाव अधिक
अमरावती : उन्हाळ्यामुळे डाळींना मागणी वाढली आहे. वाळवणाचे विविध पदार्थ तयार करण्यासाठी गृहिणींकडून हरभरा, उडीद व मूंग डाळींना पसंती दिली जाते. त्यामुळे वाढत्या मागणीवरून डाळींच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. परिणामी ग्राहकांना तडका बसला आहे.
चालू महिन्यात हरभरा डाळीच्या दरात प्रतीकिलोमागे २० रुपयांनी किरकोळ बाजारात वाढ झाली आहे. उडीद डाळीचे भावही प्रतिकिलोमागे १५ रुपयांनी वाढले आहे. हरभरा डाळ थेट ९० ते ९५ रुपये किलो, तर उडीद डाळ १०० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. यामुळे डाळींच्या बाजारात आलेली तेजी नागरिकांना थक्क करणारी आहे. घाऊक बाजारात हरभरा डाळ ८० रुपये प्रतिकिलोने विक्री होत असून, किरकोळ दर तेजीत आले आहे. नवीन हरभरा बाजारात येताच डाळींच्या दरात वाढ होणे अपेक्षित मानले जात आहे. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने हरभरा पिकाचे उत्पादनही दमदार झाले आहे, अशा परिस्थितीत हरभरा डाळीच्या बाजारात होणारी दरवाढ धक्कादायक मानली जात आहे. उडीद डाळीचा बाजारही तेजीत असून प्रतिकिलोचा दर थेट शंभर रुपयांवर गेला आहे. मागील महिन्यात उडीद डाळीचा दर ऐंशी ते नव्वद रुपये प्रतिकिलो होता. हरभरा डाळ ७० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात होती.
एकीकडे सद्या तुरीला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र दुसरीकडे विविध डाळींचे दर दिवसेंदिवस कमी होण्यापेक्षा वाढत असल्याने सर्वसामान्यांना मात्र वाढत्या डाळीच्या भावाचा सामना करावा लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.