बापरे! आईच्या दबावामुळे १३ वर्षीय मुलगी ठरली ‘बालिकावधू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2022 02:55 PM2022-06-11T14:55:23+5:302022-06-11T14:57:35+5:30
आरोपी पतीने लग्न झाल्याापासून पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अखेर त्या अनन्वित शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून तिने मामीचे घर गाठले व मामीकडे आपबीती कथन केली.
अमरावती : अवघ्या १३ वर्षीय बालिकेचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले. त्या बालविवाहानंतर पीडिता बालिकेचे कथित पतीने वारंवार लैंगिक शोषण केले. परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ५ मार्च ते ९ जून दरम्यान ही अश्लाघ्य घटना घडली.
ही आपबीती बालिकेने आपल्या मामीला सांगितली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे आईनेच भाऊ व भावजयींच्या सहकार्याने पोटच्या मुलीचा बालविवाह घडवून आणला. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी एका ४० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पीडित मुलीची आई, पती सागर पवार (३०), सासू रत्ना पवार (४५), मामा विजू सूर्यवंशी (४८), मामी सविता सूर्यवंशी, जेठ रवी पवार (३२), जेठाणी पूजा पवार (२८. सर्व रा. पांढरी) यांच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३७६, ३७६ (२), जे, ३७६ (२) (एन), ३७६ (३), पोक्सोचे कलम ६, १२ व बालविवाह प्रतिबंधक अधिनियमातील कलम ९, १०, ११ अन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, पीडित १३ वर्षीय मुलगी फिर्यादी महिलेची भाची असून, पीडितेच्या आईसह सहा जणांनी त्या मुलीचा सागर पवार याच्यासोबत बळजबरीने विवाह लावून दिला. फिर्यादी महिलेला तो विवाह मान्य नसल्याने ती त्या लग्नात गेली नाही. आरोपी पती व सासरकडील अन्य मंडळी बालवधूला गावी घेऊन गेली. आरोपी पतीने लग्न झाल्याापासून पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अखेर त्या अनन्वित शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून तिने मामीचे घर गाठले. मामीकडे आपबीती कथन केली. मामीने तिला घेऊन ९ जून रोजी रात्री परतवाडा पोलीस ठाणे गाठले. रात्री १०.५२ च्या सुमारास पीडितेच्या आई व अन्य सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. १५ दिवसांपूर्वीही असाच एक प्रकार उघडकीस आला होता.