'धनवर्षाव' करणाऱ्या दादा चव्हाणांच्या धनस्रोतांवर ‘इन्कमटॅक्स’ची पडेल का नजर?
By admin | Published: October 4, 2016 12:17 AM2016-10-04T00:17:20+5:302016-10-04T00:17:20+5:30
शंकर महाराज यांच्या आश्रमांवर 'धनवर्षाव' करणाऱ्या दादा चव्हाण यांच्या धनस्त्रोतांची चौकशी करणे हा नरबळी प्रकरणातील महत्त्वाचा तपासबिंदू ठरू शकेल.
कशासाठी हे ? : आयुष्याच्या सायंकाळी करोडोंची उलाढाल
अमरावती : शंकर महाराज यांच्या आश्रमांवर 'धनवर्षाव' करणाऱ्या दादा चव्हाण यांच्या धनस्त्रोतांची चौकशी करणे हा नरबळी प्रकरणातील महत्त्वाचा तपासबिंदू ठरू शकेल.
पुण्याचे दादा चव्हाण यांनी पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात मोठ्या प्रमाणात अर्थदान केले आहे. त्यांचे चिरंजीव सिद्धेश्वर हे या 'अर्थदाना'ची गर्वाने 'मार्केटिंग' करीत असतात. पंढरपूर येथे शंकर महाराज यांच्या आश्रमासाठी कोट्यवधी रुपयांची जागा खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीची जबाबदारी दादा चव्हाण यांनी स्वीकारली होती. चव्हाणांनीच ही खरेदी केल्याची माहिती आहे. भक्तीच्या नावावर शंकर महाराजांच्या नजिक वावरणाऱ्या आणि पिंपळखुट्याच्या आश्रमात वास्तव्य करणाऱ्या चव्हाणांना कोट्यवधी रुपयांच्या जमीनींच्या व्यवहारात इतका रस कशासाठी? आयुष्याच्या सायंकाळी ध्यानमग्न होण्याऐवजी कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारात गुंतणाऱ्या दादा चव्हाणांच्या अर्थस्त्रोतांचे ठावठिकाणे शोधणे या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे झाले आहे. शंकर महाराज यांच्या आश्रमात तगडी रक्कम दान करणाऱ्यांपैकी चव्हाण हे अग्रणी आहेत. ही रक्कम येते कुठून? त्यामागचे उद्देश काय? ही रक्कम मिळविण्यासाठी आश्रमाचा उपयोग केला जातो काय? कोट्यवधी रुपयांचे दान दिले जाते ते कशासाठी? या व्यवहारांचा पारदर्शक हिशेब ठेवला जातो काय? त्यापोटी नियमांनुसार शासनाला 'इन्कमटॅक्स' दिला जातो काय? की तो बुडविला जातो? बुडविल्यास कुणाच्या माध्यमातून? आदी प्रश्नांची उत्तरे लोकदरबारात यायलाच हवीत. चव्हाणांच्या स्त्रोतांचे उगम, व्यवहारांची गणिते आणि अदा केलेला कर यावर इन्कमटॅक्स खात्याने नजर ठेवल्यास, बऱ्याच गुपितांचे झरे उघउ होतील.