तळेगावात पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:18 AM2019-06-03T01:18:36+5:302019-06-03T01:19:19+5:30
सुमारे १२ हजार लोकसंख्येच्या तळेगाव दशासर येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावातील हातपंप व विहिरी कोरड्या पडल्याने ही स्थिती उदभवली आहे. तूर्तास गावाला तीन दिवसांआड पाणीपुरवठा तोही मर्यादित स्वरुपात केला जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव दशासर : सुमारे १२ हजार लोकसंख्येच्या तळेगाव दशासर येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावातील हातपंप व विहिरी कोरड्या पडल्याने ही स्थिती उदभवली आहे. तूर्तास गावाला तीन दिवसांआड पाणीपुरवठा तोही मर्यादित स्वरुपात केला जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
स्थानिक ग्रामपंचायतद्वारे सिंधबन बनातून दोन, शंकरपट परिसरातील एक व महिमापूर येथून एक अशा चार विहिरींवरून नळयोजनेचा पाणीपुरवठा एक दिवसाआड सुरू आहे. गावात ४७ हॅडपंप असून पैकी १० ते १२ नादुरूस्त आहेत. त्यामुळे
ग्रामपंचायतीद्वारे टँकरने पाणी वाटप सुरू आहे. तळेगाव येथील निम्म्यापेक्षा अधिक हातपंप व विहिरींचे पाणी संपूर्णत: आटल्यामुळे व गावातील अधिकाधिक विहीरींमधून गाळ काढण्याचे काम सुरू असल्याने पाण्याची भयंकर टंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतने स्वनिधीमधून टँकरने पाणी पुरवठा सुरू केला. याकरीता ग्रा.पं. सदस्य, ग्रामविकास अधिकारी सहकार्याच्या भूमिकेत आहेत. गावातील नबाबभाई , प्रशांत बेंबडकर यांनी टँकर उपलब्ध करून दिले. सुरेश मलवार यांनी टँकर ला पाणी देण्याची हमी दिली. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून ग्रामपंचायतीस १३ हातपंप मंजूर आहेत, मात्र ते तांत्रिक प्रक्रियेत अडकले आहेत. गावातील पाणीटंचाईकडे राजकीय लोकांनी दुर्लक्ष चालविल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे.