कौंडण्यपूरला दहीहंडी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 10:44 PM2018-11-24T22:44:43+5:302018-11-24T22:44:57+5:30
देवी रुक्मिणीचे माहेर श्रीक्षेत्र कौंडण्यापूर येथे कार्तिक प्रतिपदेला सकाळी शासकीय महापूजेनंतर दुपारी ५.३० वाजता येथील गोकुळपुरीत हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत दहीहंडीचा सोहळा पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुऱ्हा : देवी रुक्मिणीचे माहेर श्रीक्षेत्र कौंडण्यापूर येथे कार्तिक प्रतिपदेला सकाळी शासकीय महापूजेनंतर दुपारी ५.३० वाजता येथील गोकुळपुरीत हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत दहीहंडीचा सोहळा पार पडला.
आ. यशोमती ठाकूर, भाजप नेत्या निवेदिता चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या नवनीत राणा, पिंपरी-चिंचवडच्या नगरसेविका सीमा सावळे, दिनेश बूब, विलास इंगोले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष रीतेश पांडव, संदीप आमले, पंचायत समिती सभापती अर्चना वेरुळकर, उपसभापती लुकेश केने, सदस्य मंगेश भगोले, लढा संघटनेचे संजय देशमुख, जिल्हा परिषद सदस्य गौरी देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्तिक पौर्णिमेच्या प्रतिपदेला पंढरीचा विठ्ठल अडीच दिवसासाठी कौंडण्यपूरला मुक्कामी असतो, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे विदर्भातून अनेक पालख्या व भजनी मंडळी कौंडण्यपूर येथे येऊन लाडक्या माउलींच्या चरणी नतमस्तक झाले. पांडुरंगावर वारकरी भाविकांची मोठी श्रद्धा असल्याने प्रतिपदेच्या सकाळीच येथे मुक्कामी असलेले वारकरींनी वर्धा नदीवर स्नान करून सकाळी ५ पासून मंदिरात दर्शनासाठी रांग लावली. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. दहीहंडीपूर्वी देवस्थानातील सभागृहात काल्याचे कीर्तन झाले. यानंतर सर्व भाविक भक्त गोकुळपुरीत एकत्र आले. दहीहंडीचे पूजन जगद्गुरू राजराजेश्वरचार्य स्वामी माउली यांनी केले. त्यानंतर दहीतीर्थ भाविकांना वितरित करण्यात आले.
चोख बंदोबस्त
पंधरवड्यात लाखो भाविक कार्तिक यात्रेला येतात. त्यानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कुऱ्हा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. दहीहंडीला विशेष सुरक्षा होती तसेच दररोज पाच अधिकारी, १०० कर्मचारी व पोलीस मित्र आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे कुºहाचे पोलीस निरीक्षक सुनील किणगे यांनी सांगितले.