शंभरीतील गोविंदरावांची दिनचर्या युवकांनाही लाजवणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 10:47 PM2018-04-14T22:47:25+5:302018-04-14T22:47:25+5:30
नाव गोविंदराव गंगारामजी मसने... राहणार शिंदी बु., तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती... ते १ मे रोजी वयाची शंभरी गाठणार आहेत. त्यांना या वयातही विनाचष्म्याने वृत्तपत्र आणि पुस्तक वाचन करताना पाहून लोक आश्चर्याने पाहतात.
नरेंद्र जावरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : नाव गोविंदराव गंगारामजी मसने... राहणार शिंदी बु., तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती... ते १ मे रोजी वयाची शंभरी गाठणार आहेत. त्यांना या वयातही विनाचष्म्याने वृत्तपत्र आणि पुस्तक वाचन करताना पाहून लोक आश्चर्याने पाहतात. त्यांची दिनचर्या युवकांनाही लाजविणारी आहे. दररोज मॉर्निंग वॉक, रुग्णांची तपासणी, सायंकाळी आर्य समाजाचा प्रचार-प्रसार ते नित्यनेमाने करतात.
दररोज सूर्योदयापूर्वी उठण्याची त्यांची निरंतर सवय. थकवा येईल तिथपर्यंत, अर्धा किलोमीटर मॉर्निंग वॉक. मग सकाळचा चहा किंवा दूध, सोबत दोन ते तीन बिस्कीट. त्यानंतर दवाखान्यात आलेल्या बालरुग्णांची तपासणी. ११ वाजता जेवण, त्यानंतर वृत्तपत्र आणि पुस्तकांचे वाचन आणि सायंकाळी चार वाजेपर्यंत झोप. उठल्यावर पुन्हा चहा आणि मग घरी आलेल्या गावातील नागरिकांसोबत आर्य समाजाची चर्चा, रात्री आठ वाजता जेवण आणि मग झोप, अशी दिनचर्या असलेले गोविंदराव अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. पंचक्रोशीत आदरणीय असे व्यक्तिमत्त्व आहेत.
१ मे १९१८ रोजी जन्मलेले गोविंदराव पेशाने शिक्षक. मुख्याध्यापक पदावरून ते निवृत्त झाले. शाळा सांभाळताना एक उत्कृष्ट शेतकरी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. शिंदी बु. या इवल्याशा खेड्यात त्याकाळी त्यांनी पहिल्यांदा नगदी पीक म्हणून ओळख असलेले सोयाबीनचे बी आणले होते. शेतकऱ्यांना ते पसंत पडले. शिक्षक, उत्कृष्ट शेतकरी आणि बालरोग चिकित्सा म्हणून परिसरात त्यांची ख्याती आहे. त्यांचे नातू डॉ. जितेंद्र मसने व नातसून अश्विनी त्यांच्या या कार्यात दररोज सहभागी होतात.
सेवानिवृत्तीनंतर घेतले वैद्यकीय शिक्षण
मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर स्वस्थ बसणारे गोविंदराव नव्हते. त्यांनी तत्कालीन मान्यताप्राप्त आर.एम.पी. (रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर) ही पदवी प्राप्त केली. शिंदी, पोही, कापूसतळणी आदी भागात बालरोग चिकित्सक म्हणून त्यांची ख्याती होती. स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या काळात रंगमंचावरही त्यांनी काम केले. वयाच्या शंभराव्या वर्षीसुद्धा त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. शेतातही ते चक्कर मारून येतात. खो-खो, कबड्डी त्यांचे आवडते खेळ आहेत.
‘लोकमत’ न दिसल्यास संतापतात
पुस्तकांसोबतच वृत्तपत्र वाचण्याची गोविंदरावांची आवड आजही कायम आहे. ‘लोकमत’चे ते दररोज वाचन करतात. सकाळी ‘लोकमत’ न दिसल्यास संताप व्यक्त करतात. लोकमत आणि आपली शंभरावी सोबत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.