जिल्ह्यातील डेअरी फार्म पुनर्जीवित होणार
By admin | Published: November 14, 2016 12:14 AM2016-11-14T00:14:44+5:302016-11-14T00:14:44+5:30
नापिकी, सततच्या दुष्काळाने विदर्भात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्याच्या पशू संवर्धन ...
सर्वेक्षण : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना
अमरावती : नापिकी, सततच्या दुष्काळाने विदर्भात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्याच्या पशू संवर्धन विभागाने मरणासन्न शेळी, मेंढी पालन केंद्र पुनर्जिवित करण्याचा निर्णय घेतला आहे. डेअरी फार्ममधून दुग्धगंगा वाहण्यासाठी जिल्ह्यात कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील पोहरा व धारणी येथे शेळी, मेंढी, गाय, म्हशी पालन केंद्र आहे. यापैकी तीन पशुपालन केंद्र बंद पडले आहे. या तीनही बंद पडलेल्या पशुपालन केंद्रातील कर्मचारी अन्य ठिकाणी वर्ग करण्यात आले आहे. मात्र विदर्भात पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत दुग्धगंगा वाहिली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने डेअरी फार्म पुनर्जिवित करण्याचे निश्चित झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतीसोबत जोडधंदा हा दुधाचा असून तोच प्रयोग जिल्ह्यात राबविण्याचा निश्चय शासनाचा आहे. एक डेअरी फार्म पुनर्जिवित करण्यासाठी १७ ते १८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्याअनुषंगाने सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला आहे. डेअरी फार्म पुनर्जिवित करण्याची जबाबदारी अकोला येथील पशुधन विकास महामंडळाकडे सोपविण्यात आली आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांना दुधाळू गुरांचे वाटप केले जाईल. शेतकऱ्यांकडून दूध गोळा करण्यासाठी अद्ययावत दूध संकलन केंद्र साकारले जाणार आहेत. येत्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात दुग्धगंगा वाहिली पाहिजे, यासाठी शासनकर्ते सकारात्मक पावले उचलत आहेत. तसेच बंद पडलेले तीन डेअरी फार्म विकसित केले जाणार आहे. पशुधन विकास महामंडळाला डेअरी फार्म विकसित करण्यासह शेतकऱ्यांना दुधाळू जनावरांचे वाटप करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना गुरे वाटप करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना दुधाळू गुरे वाटप करण्यात आलीत त्या शेतकऱ्यांकडून चांगल्या दरात दूध खरेदी करण्याचेही प्रस्तावित आहे. (प्रतिनिधी)