बोंडअळीने व-हाडात १०.५१ लाख हेक्टरचे नुकसान, आयुक्तांचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 02:59 AM2018-01-25T02:59:07+5:302018-01-25T02:59:26+5:30
गजानन मोहोड
अमरावती : यंदाच्या खरिपात गुलाबी बोंडअळीमुळे कापसाचे १० लाख ५१ हजार हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. यासाठी ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे ८१७ कोटी रुपयांच्या मदतीची आवश्यकता असल्याचा अहवाल विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी मंगळवारी शासनाला पाठविला.
अमरावती विभागात यंदाच्या खरिपात ९ लाख ४२ हजार ५५९ शेतकºयांनी १० लाख ८७ हजार ३७५ हेक्टरमध्ये कापसाची पेरणी केली. मात्र, आॅक्टोबर महिन्यात आलेल्या गुलाबी बोंडअळीच्या संकटाने एकूण क्षेत्राच्या तुलनेत ९० टक्के क्षेत्रात कापसाचे ३३ टक्क््यांवर नुकसान झाले आहे. पाचही जिल्ह्यांतील संयुक्त अहवालानुसार, यामध्ये जिरायती कापसाचे ९ लाख ११ हजार ८४७ हेक्टर, तर बागायती कापसाचे १ लाख ३९ हजार ९२३ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी ६८०० रुपये याप्रमाणे ६२८ कोटी ६७ लाख ६६ हजार, तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे १८८ कोटी ३६ लाख १३ हजारांची मदत आवश्यक आहे. हे नुकसान केंद्राच्या नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी पात्र आहे.
बियाणे कंपन्यांकडून भरपाई व ‘एनडीआरएफ’ची मदत मिळावी, यासाठी गुलाबी बोंडअळीबाधित क्षेत्राच्या पंचनाम्याचे आदेश विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी ७ डिसेंबरला पाचही जिल्ह्यधिकाºयांना देऊन अहवाल मागविला. ५ डिसेंबरच्या बैठकीत कापसाच्या बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करून केंद्राच्या एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. या अनुषंगाने पाचही जिल्हाधिकाºयांनी संबंधित तहसीलदार, बीडीओ व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून संयुक्त अहवाल मागविला होता. बुलडाणा जिल्ह्याचा अहवाल उशिरा प्राप्त झाल्याने अखेर मंगळवारी विभागाचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.