वादळी वाऱ्याने कारला परिसरात केळी पीकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:14 AM2021-05-18T04:14:23+5:302021-05-18T04:14:23+5:30
अंजनगाव सुर्जी : एक वर्षापासून कोरोना महामारीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना निसर्गानेदेखील झोडपून काढले. १६ मे रोजी आलेल्या ...
अंजनगाव सुर्जी : एक वर्षापासून कोरोना महामारीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना निसर्गानेदेखील झोडपून काढले. १६ मे रोजी आलेल्या वादळी वाऱ्याने कापणीसाठी आलेले केळीचे पीक पार उद्ध्वस्त झाल्याने तालुक्यातील कारला, अडगाव येथील शेतकरी संकटात सापडले आहे.
तालुक्यातील कारला व अडगाव या गावात रविवारी मोठ्या प्रमाणत आलेल्या वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली. शेतात काढणीसाठी आलेल्या केळी पिकाचे झाड मुळासकट उन्मळून पडल्याने अवघ्या काही दिवसांवर कापणीसाठी आलेले हातचे पीक निसर्गाने हिरावून नेले. ज्यामुळे या दोन गावांतील शेतकऱ्यांचे अंदाजे ३० हेक्टर केळी पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकरी राजू दाळू यांनी सांगितले. शासनाने लवकरात लवकर या सर्व केळी उत्पादकांच्या शेताचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. झालेल्या नुकसानाची दखल घेत आमदार बळवंत वानखडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार अभिजित जगताप, तालुका कृषी अधिकारी मनोहर कोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद दाळूसह कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.