४२ मंडळात अतिवृष्टीने नुकसान, विमा कंपनीला १२ हजार ‘इंटिमेशन’
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: August 8, 2023 05:18 PM2023-08-08T17:18:06+5:302023-08-08T17:18:32+5:30
कंपनीस्तरावर अद्याप पंचनामे नाहीत
अमरावती : जुलै महिन्यात तब्बल ४२ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या बाधित पिकांचे पंचनामे करण्यात यावे व परतावा मिळण्यात यावा, यासाठी तब्बल ११७४० शेतकऱ्यांनी विहित मुदतीत म्हणजे नुकसानीचे ७२ तासांचे आत पीक विमा कंपनीकडे पूर्वसूचना अर्ज (इंटिमेशन) दाखल केले आहेत. अद्याप कंपनी स्तरावरून पंचनामे करण्यात न आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
यंदाच्या खरीप हंगामात मान्सून दोन आठवडे विलंबाने आला व चार आठवड्यांनी सक्रिय झाला. ६ जुलैपासून पावसाची रिपरिप सुरू झाली व जुलैअखेरपर्यंत तब्बल ४२ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. नदी-नाल्यांना पूर आल्याने लगतची ५०० हेक्टर शेतजमीन खरडली गेली. याशिवाय पूर व सततच्या पावसाने बहुतेक शेतात पाणी साचून पिके पाण्याखाली बुडाली.
या सर्व आपत्तींमुळे किमान ७० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अहवाल आहे. या नैसर्गिक आपत्तीसाठी पीकविम्याची भरपाई देय असल्याने पीकविमा योजनेत सहभाग असलेल्या शेतकऱ्यांनी टोल फ्री नंबर व ॲपवर याच्या पूर्वसूचना पीक विमा कंपनीला दिल्या आहेत.