सततच्या पावसाने पिकांचे नुकसान; पंचनामे केव्हा ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 11:04 AM2024-09-04T11:04:18+5:302024-09-04T11:04:50+5:30
Amravati : यापूर्वी शासन मदत, यंदा मात्र पडला विसर, शेतकऱ्यांमध्ये नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दोन महिन्यांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. यंत्रणेद्वारा फक्त अतिवृष्टीने बाधित पिकांचे पंचनामे करण्यात आले. यापूर्वी २०२२-२३ च्या खरिपात शासनाने सततच्या पावसाने झालेल्या बाधित पिकांचे पंचनामे करून 'एनडीआरएफ'च्या निकषाने मदत दिली होती. यंदा मात्र शासनाला विसर पडला आहे.
यावर्षी मान्सून वेळेत दाखल झाला, त्यानंतर वाटचाल मंदावली व जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून पुन्हा पावसाने दमदार सुरुवात केली ती अजूनही सुरूच आहे. यादरम्यान ३२ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. नदी नाल्यांना पूर आल्याने पिके खरडली गेली. शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी यंत्रणेद्वारा करण्यात आले. मात्र, दोन महिन्यांपासून सतत पाऊस असल्याने पिकांची वाढ खुंटली काही भागांत पिके पिवळी पडली. ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव व पाऊस यामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. अतिवृष्टी नसली तरी सततच्या पावसाने सर्वच पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे सरासरी उत्पादनात कमी येण्याची शक्यता आहे. या बाधित पिकांसाठी शासनस्तरावरून कोणतेही निर्देश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
सोयाबीन पिवळे, तुरीवर मर
सततच्या पावसामुळे काही भागात सोयाबीनची कायिक वाढ झाली. तर काही भागात वाढ खुंटून पिवळे पडले आहे. अशीच स्थिती कपाशीची आहे. याशिवाय कीड व रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर झालेला आहे. तुरीवर बुरशीजन्य रोगामुळे 'मर' रोग आलेला आहे. अनेक भागातील तुरी जागेवरच सुकत असल्याने सरासरी उत्पादनात कमी येणार असल्याचे वास्तव आहे.
जिल्हास्थिती (हेक्टरमध्ये)
खरिपाचे पेरणी क्षेत्र : ६.३५ लाख
सोयाबीनचे क्षेत्र : २.५१ लाख
कपाशीचे क्षेत्र : २.२३ लाख
तुरीचे क्षेत्र : १.१२ लाख
अतिवृष्टीच्या नुकसानीपेक्षा बाधित क्षेत्र जास्त
जून व जुलै महिन्यांत अतिवृष्टीमुळे ३७५ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. यासाठी ३२.२८ लाखांच्या मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठविला आहे. त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त नुकसान सततच्या पावसाने झालेले आहे. या नुकसानीसाठी शासनाच्या कोणत्याही सूचना नाही. शिवाय या बाधित पिकांना विम्याचा परतावादेखील मिळत नाही.