‘दामिनी’ पथकाने आणून सोडले; तरिही ‘ती’ने जग सोडले
By प्रदीप भाकरे | Published: January 22, 2024 05:41 PM2024-01-22T17:41:10+5:302024-01-22T17:43:00+5:30
वडाळीत २१ वर्षीय तरूणीची आत्महत्या : कारण अस्पष्ट
अमरावती: वडाळी येथील एका २१ वर्षीय तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. २० जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी शनिवारी रात्री आकस्मिक मृत्युची नोंद केली. आंचल नामक ती तरूणी गेल्या काही दिवसांपासून गुमसूम राहत होती.
१८ जानेवारी रोजी ती घरात कुणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. तिला पोलीस आयुक्तालयातील दामिनी पथकाने दुपारच्या सुमारास घरी आणून सोडले होते. दरम्यान २० जानेवारी रोजी दुपारी तिचे वडिल कामानिमित्त घराबाहेर गेले असताना तिची आई व ती अशा दोघीच घरी होत्या. त्याचवेळी तरूणीने तिच्या खोलीचे दार आतून बंद केले. दुपारी चारच्या सुमारास ते घरी पोहोचली असता आंचलने आतून दार बंद केले, उघडतच नाही, असे आंचलच्या आईने पतीला सांगितले. त्यावर आंचलच्या वडिलांनी जिन्याचे दार उघडून पाहिले असता आंचल ही जिन्याच्या लोखंडी रेलिंगला साडीने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आली. तिला तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. घटनास्थळावर उंदिर मारण्याचे औषध देखील आढळून आले. तिच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही.