पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये केवळ ३८ टक्के जलसाठा

By जितेंद्र दखने | Published: July 19, 2024 08:03 PM2024-07-19T20:03:07+5:302024-07-19T20:03:57+5:30

हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी विभागातील नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Dams in West Vidarbha have only 38 percent water storage | पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये केवळ ३८ टक्के जलसाठा

पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये केवळ ३८ टक्के जलसाठा

अमरावती: पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीदेखील अमरावती विभागातील लहान-मोठी धरणे व तलावांची अवस्था अद्यापही बिकट आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३८.६१ टक्केज,जलसाठा झाला आहे. मध्यम प्रकल्प व सिंचन तलावांमध्येही समाधानकारक जलसाठा झालेला नाही.

यंदाच्या पावसाळ्यात सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणार काय. यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा वरुणराजाकडे लागल्या आहेत. विभागातील ९ मोठ्या प्रकल्पांमध्ये ५४०.५० दशलक्ष घनमीटर म्हणजे ३८.६१ टक्के जलसाठा झाला असून एकूण २७ मध्यम प्रकल्पांमध्ये ३४९.८२ दलघमी (४५.३३ टक्के), तर २५३ लघुप्रकल्पांमध्ये २२२ दलघमी (२३.९४ टक्के) जलसाठा आहे.

हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी विभागातील नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सर्व लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये जलसाठा केवळ ३५.८८ टक्के एवढा आहे. गतवर्षी १५ जुलैअखेर मोठ्या प्रकल्पांमध्ये ६११ दलघमी व म्हणजे ४३.६९ टक्के जलसाठा झाला होता तर मध्यम प्रकल्पांमध्ये ३२२ दलघमी म्हणजे ४१.७८ टक्के पाण्याची साठवणूक झाली होती. सर्वच प्रकल्पांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत पाच ते दहा टक्के जलसाठा कमी आहे.

विभागातील प्रकल्पातील सद्यःस्थिती
अमरावती विभागातील अप्पर वर्धा प्रकल्पात सध्या २६६ दलघमी (४७ टक्के), पूस ५३ दलघमी (५८ टक्के), अरुणावती ६१ दलघमी (३६ टक्के), बेंबळा ८३ दलघमी (४५ टक्के), काटेपूर्णा २४ दलघमी (२८ टक्के), वाण २१ दलघमी (२५ टक्के), नळगंगा २२ दलघमी (३२ टक्के), पेनटाकळी ७ दलघमी (१३ टक्के) तर खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे.

Web Title: Dams in West Vidarbha have only 38 percent water storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.