सुरक्षारक्षकांच्या वाढीव संख्येवर दंडुका
By admin | Published: February 10, 2017 12:12 AM2017-02-10T00:12:25+5:302017-02-10T00:12:25+5:30
महापालिका आयुक्तांनी बुधवारी पुन्हा ४४ सुरक्षारक्षकांना कामावरून कमी केले. १ फेब्रुवारीला ३७ सुरक्षारक्षकांची कपात करण्यात आली होती.
आयुक्त आक्रमक : आणखी काहींची होणार गच्छंती
अमरावती : महापालिका आयुक्तांनी बुधवारी पुन्हा ४४ सुरक्षारक्षकांना कामावरून कमी केले. १ फेब्रुवारीला ३७ सुरक्षारक्षकांची कपात करण्यात आली होती. त्यामुळे एकाच आठवड्यात सुरक्षारक्षकांच्या संख्येत ८१ ची कपात करण्यात आली. दबाव झुगारून करण्यात आलेल्या या कारवाईने महापालिकेच्या आस्थापना खर्चात महिन्याकाठी लाखो रूपयांची बचत होणार आहे.
मे २०१६ मध्ये ‘अमृत’ या सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या संस्थेशी १४६ सुरक्षारक्षक पुरविण्याचा करारनामा उपायुक्त विनायक औगड यांच्याशी स्वाक्षरीनिशी करण्यात आला. मात्र, जानेवारी २०१७ अखेरपर्यंत सुरक्षारक्षकांच्या संख्येत अवाजवी वाढ करण्यात आली. स्मशानभूमी आणि बंद पडलेल्या जकात नाक्यासह जवाहरगेटच्या सौंदर्यीकरणावर अनेक सुरक्षारक्षक दाखविण्यात आलेत.
महिन्याकाठी लक्षावधींचा खर्च
अमरावती : प्रत्यक्षात तेथे त्यांची उपस्थिती व आवश्यकता लक्षात घेण्यात आली नाही. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने डोळे मिटून आणि हजेरी अहवाल न बघता फाईल्स चालविल्यात. हा सावळागोंधळ लक्षात आल्यानंतर आयुक्तांनी दंडुका उगारत सुरक्षारक्षक आणि एकूणच कंत्राटीसेवेचा आढावा घेतला. अंतर्गत परिपत्रक काढत सर्व विभागप्रमुखांकडून त्यांच्या अधिनस्थ विभागातील कंत्राटींच्या संख्यात्मक उजळणीचे निर्देश दिलेत. शनिवारी त्यासाठी बैठक घेऊन इतक्या मोठ्या संख्येत कंत्राटीची आवश्यकता आहे का, याबाबतची वस्तुस्थिती आयुक्तांनी जाणून घेतली. दोन्ही उपायुक्तांनी त्यांच्या अधिनस्थ विभागात जाऊन कंत्राटींची संख्या जाणून घेऊन कपातीची संख्या आयुक्तांना कळविली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)