कावलीतील जुन्या ग्रामपंचायत इमारतीचा नागरिकांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:11 AM2021-06-26T04:11:03+5:302021-06-26T04:11:03+5:30
स्थानिक जुन्या ग्रामपंचायतीची इमारत सद्य:स्थितीत धोकादायक असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे समजते. या इमारतीमध्ये अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीचे मुख्य ...
स्थानिक जुन्या ग्रामपंचायतीची इमारत सद्य:स्थितीत धोकादायक असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे समजते.
या इमारतीमध्ये अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीचे मुख्य कार्यालय होते; परंतु गेल्या पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची नवी इमारत झाल्याने या इमारतीकडे दुर्लक्ष झाल्याने ती आता पडक्या स्थितीत उभी आहे.
या ऐतिहासिक इमारतीमध्ये मंगरूळ दस्तगीर येथील गणपती महाराजांनी वास्तव्य केले. सोबतच अनेक साहित्याची निर्मिती या इमारतीमधूनच झाल्याचे सांगितले जाते.
याच इमारतीत गावात इमारत उपलब्ध नसल्याने शाळा भरवली गेली. येथूनच अनेक विद्यार्थ्यांनी ज्ञानाचे धडे घेतले व आता मोठ्या हुद्द्यावर येथील नागरिक आहेत. मात्र, ज्या इमारतीमधून अनेक डॉक्टर, वकील, साहित्यिक, इंजिनिअर असे नागरिक निर्माण केले; परंतु या इमारतीकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे बोलले जात आहे.
सदर इमारतीमध्ये प्रवेश केआ असता इमारतीच्या मुख्य खांबावर तसेच भिंतीवर अनेक माणसाच्या मनाला चालना देणाऱ्या व शैक्षणिक अशा म्हणी लिहिलेल्या दिसून येतात. मात्र, सद्य:स्थितीत ही इमारत केवळ मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनली आहे.
या इमारतीचा वरचा भाग कवेलू पूर्ण निकामी होऊन फुटल्या गेल्याने त्यामधून पावसाचे पाणी मध्ये पडते. सोबतच शंभर वर्षांच्या वर या इमारतीचे आयुष्य झाले असल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे भिंती पूर्ण जीर्ण झालेल्या आहेत. या इमारतीच्या सभोवताल अनेक नागरिक वास्तव्य करतात. मात्र आपला जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी ते वास्तव्य करतात. त्यांच्या जीविताला धोका झाला, तर याची जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्न मात्र नागरिकांनी उपस्थित केला आहे.
याच इमारतीत ज्ञानदान, समाजसेवा, गावाचा सर्वांगीण विकास अशा अनेक चर्चा तेथे रंगल्या गेल्या; परंतु आता मात्र या इमारतीकडे कोणीही लक्ष देत नसल्याने ही इमारत कोसळल्याशिवाय राहणार नसल्याचे समजते.
सदर इमारतीसाठी मध्यंतरी अनेक सामाजिक कार्यकर्ते आरक्षण करण्यासाठी पुढे आले होते; परंतु त्याचा तीळमात्रही फायदा झाला नसल्याने ही इमारत मात्र पुन्हा दुर्लक्षित झाली आहे. सदर इमारतीकडे पुरातन विभागाने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.