भीषण आगीत आॅईल मिल जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:46 PM2018-05-21T23:46:42+5:302018-05-21T23:46:52+5:30
शॉर्ट सर्कीटने रविवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत रतनगंज परिसरातील साहू बाग स्थित पंकज आॅइल मिल व शेजारचे श्री दाल अँड आॅइल मिल जळून खाक झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शॉर्ट सर्कीटने रविवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत रतनगंज परिसरातील साहू बाग स्थित पंकज आॅइल मिल व शेजारचे श्री दाल अँड आॅइल मिल जळून खाक झाले. अग्निशमन दलाने सहा तास अथक परिश्रम घेऊन आग नियंत्रणात आणली. आगीत कोट्यवधीच्या नुकसानाचा अंदाज व्यक्त होत आहे.
रतनगंज परिसरात जवळपास चार हजार चौरस फूट जागेत अजय चौधरी यांची पकंज आॅइल मिल आहे. त्याच्या शेजारी श्री दाल अँड आॅइल मिल आहे. या ठिकाणी सरकी तेल व ढेप तयार केली जाते. रविवारी मध्यरात्री १ वाजता दोन्ही ठिकाणी शॉर्ट सर्कीटने आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. काही वेळातच अग्निशमन अधीक्षक भरतसिंह चौव्हान यांच्या मार्गदर्शनास वलगाव रोडवरील उपकेंद्र प्रमुख सैयद अन्वर यांच्यासह फायरमन मनोज इंगोले, मनोज अंबाडकर, गोकुल मुंढे, मनीष उताणे, सुनील काकडे, तायडे, सूर्यवंशी, चालक विजू पंधरे, इम्रान खान, शोएब खा, आजने, कोकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन पथकाने मिलमध्ये पाण्याचा मारा केला; सरकी, ढेप व तेलामुळे आगीची भीषणचा अधिकच वाढली होती. आगीचे लोळ बाहेर पडत होते. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मिलच्या चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू ठेवला. अखेर सकाळी ६ च्या सुमारास आग आटोक्यात आली. आगीत मिलमधील यंत्रे, सरकी ढेप, तेल व इलेक्ट्रिक उपकरणे जळून खाक झाली. त्यामध्ये कोट्यवधीच्या नुकसानाचा अंदाज व्यक्त केला आहे.