पोहरा जंगलात भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:02 AM2018-03-27T00:02:48+5:302018-03-27T00:02:48+5:30
वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत इंदला, उत्तर वडाळी या जंगलात सोमवारी अचानक लागलेल्या आगीत १३ हेक्टर वनक्षेत्र जळाले. यात १० हेक्टर खासगी क्षेत्रालाही क्षती पोहोचली आहे. जोरदार वारे वाहत असल्याने आग नियंत्रणासाठी वनकर्मचाऱ्यांना सुमारे तीन तास कसरत करावी लागली.
आॅनलाईन लोकमत
पोहरा : वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत इंदला, उत्तर वडाळी या जंगलात सोमवारी अचानक लागलेल्या आगीत १३ हेक्टर वनक्षेत्र जळाले. यात १० हेक्टर खासगी क्षेत्रालाही क्षती पोहोचली आहे. जोरदार वारे वाहत असल्याने आग नियंत्रणासाठी वनकर्मचाऱ्यांना सुमारे तीन तास कसरत करावी लागली.
यंदा जंगलात आग लागण्याचा घटनांमध्ये वाढ झाली असून, वडाळी जंगलात आग लागल्याची ही दुसरी नोंद आहे. इंदला, उत्तर वडाळीतील आग विझविण्यासाठी आठ ब्लोअर मशीनचा वापर करण्यात आला. सोसाट्याचा वारा असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. जंगल वेगाने जळत असताना वनकर्मचाऱ्यांनी देखील ते विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, या आगीत कोणत्याही वन्यजिवाचे नुकसान झाले नाही. वडाळी जंगलात आग लागल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध वनगुन्हा जारी करण्यात आला आहे. आगीवर नजर ठेवण्यासाठी तीन मचानी तयार केल्या आहेत.
विमवि परिसर आगीच्या विळख्यात
अमरावती : शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या परिसरात सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गवत, वृक्ष जळून खाक झाले. ही आग एनसीसी क्वॉर्टरपर्यंत पोहोचली होती. मात्र, अग्निशमन पथकाने आग नियंत्रणात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पाण्याच्या पाच बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
१३ हेक्टर जंगल जळाले
पोहरा: आठ हेक्टर इंदला, तर पाच हेक्टर उत्तर वडाळी असे एकूण १३ हेक्टर जंगलात आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोहरा वर्तुळ अधिकाऱ्यांनी वनगुन्हा जारी करताना याबाबत नोंद केली आहे. जंगलातील आग विझविण्यासाठी अद्ययावत यंत्रणा नसल्याची बाब सोमवारच्या घटनेनंतर पुढे आली आहे.
खासगी क्षेत्रालाही धग
पोहरा : वडाळी जंगलात लागलेल्या आगीत वनक्षेत्रासह १० हेक्टर खासगी क्षेत्रदेखील जळाले आहे. आगीने वनसंपदा लक्ष्य केल्याचे दिसून आले. काही दुर्मीळ वनौषधीसुद्धा आगीच्या लक्ष्य ठरल्यात. वणवा आटोक्यात आणताना खासगी व्यक्तींना मोठी कसरत करावी लागली. या आगीत शेती उत्पादनाचे नुकसान झाले आहे.