उड्डाणपुलाच्या उतारावर धोकादायक खड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:23 AM2018-07-13T01:23:17+5:302018-07-13T01:23:53+5:30
अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलाच्या उतारावर जीवघेणा खड्डा तयार झाला आहे. पावसाचे पाणी साचल्याने चालकांसाठी हा खड्डा धोक्याचा ठरत आहे. प्रशासनाची या गंभीर बाबीकडे डोळेझाक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलाच्या उतारावर जीवघेणा खड्डा तयार झाला आहे. पावसाचे पाणी साचल्याने चालकांसाठी हा खड्डा धोक्याचा ठरत आहे. प्रशासनाची या गंभीर बाबीकडे डोळेझाक आहे.
सहा महिन्यांपूर्वी नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाच्या उतारावर कामकाजासाठी खोदकाम करण्यात आले. त्या ठिकाणी खड्डा तयार झाला. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यावर तो बुजविण्यात आला. मात्र, नुकत्याच झालेल्या पावसाने तेथे पुन्हा खड्डा तयार झाला. त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. वाहन चालकांसाठी हा खड्डा धोकादायक ठरत आहे. या उड्डाणपुलावरील पथदिवे शोभेचे झाले आहेत. रात्रीच्या अंधारात उड्डाणपुलाच्या उतारावरील खड्डा एकाएकी दृष्टीस पडत असल्याने नवख्या चालकांचा अपघात होतो.
आंदोलनाची दखल
आजी-माजी नगरसेवकांनी बुधवारी अमरावती ते बडनेरा मार्गावरच्या खड्ड्यातील पाण्यात झोपून केलेल्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत तेवढ्या भागातील खड्डे बुजविले. तथापि, याच मार्गावरील नरखेड उड्डाणपुलापासून ते जुनी वस्तीपर्यंतचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या खराब रस्त्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत.