मेळघाटात भीषण पाणीटंचाईचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 01:29 AM2019-06-20T01:29:08+5:302019-06-20T01:29:50+5:30
विहिरीत सोडलेले टँकरचे पाणी ओढून काढत असताना १५ वर्षीय मुलगी त्यात पडली. गंभीर जखमी झालेल्या या मुलीचा नागपूरला उपचारादरम्यान बुधवारी पहाटे ४ वाजता मृत्यू झाला. मनीषा सीताराम धांडे (१५, रा. मोथा) असे मृताचे नाव आहे. चिखलदरा तालुक्यात ५० पेक्षा अधिक गावांना ३० टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : विहिरीत सोडलेले टँकरचे पाणी ओढून काढत असताना १५ वर्षीय मुलगी त्यात पडली. गंभीर जखमी झालेल्या या मुलीचा नागपूरला उपचारादरम्यान बुधवारी पहाटे ४ वाजता मृत्यू झाला.
मनीषा सीताराम धांडे (१५, रा. मोथा) असे मृताचे नाव आहे. चिखलदरा तालुक्यात ५० पेक्षा अधिक गावांना ३० टँकरने पाणीपुरवठा होत आहे. मोथा गावातसुद्धा महिन्याभरापासून टँकरने विहिरीत पाणी सोडले जाते. मनीषा धांडे ही ९ जून रोजी पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली होती. बकेट ओढताना तिचा तोल गेला आणि ती विहिरीत कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. महिलांनी आरडाओरड करताच नागरिक मदतीला धावले. मनीषाला चिखलदरा येथे ग्रामीण रुग्णालयानंतर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने तेथून नागपूरला रवाना करण्यात आले. तिच्यावर मागील दहा दिवसांपासून उपचार सुरू होते. बुधवारी पहाटे ४ वाजता तिने अखेरचा श्वास घेतला.
मृतदेहासाठी याचना, जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता
उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या मनीषाचा मृतदेह आणण्यासाठी मदतीची याचना सोशल मीडियावर खोज संस्थेचे बंड्या साने यांनी टाकली होती. त्यावर प्रशासनातील अधिकारी, डॉक्टर आदींनी प्रतिसाद दिला. सदर बाब जिल्हाधिकारी शैलेश नोवाल यांना माहीत होताच त्यांनी तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्याशी संपर्क साधला. यानंतर मनीषाचा मृतदेह नागपूरहून अमरावती आणि तेथून मोथा या गावापर्यंत शासकीय खर्चाने बुधवारी सायंकाळी ५ वाजता पोहचविण्यात आला.