त्या चिमुकल्याचा घातपात ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:26 AM2019-05-12T01:26:39+5:302019-05-12T01:26:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वरूड : चिमुकल्या अजयचा वाहनात गुदमरून झालेला मृत्यू हा घातपात असल्याचा संशय मृताची आई व आजीने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : चिमुकल्या अजयचा वाहनात गुदमरून झालेला मृत्यू हा घातपात असल्याचा संशय मृताची आई व आजीने पोलिसांकडे व्यक्त केला आहे.
स्थानिक पांढुर्णा रोडवरील शिक्षक कॉलनीलगतच्या शिवारातून रविवारी बेपत्ता झालेल्या अजय पंधरेचा मृतदेह शुक्रवारी बंद कारमध्ये आढळून आला. त्याच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त करण्यात येत असल्याने नातेवाईक व पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
आई-वडील शेतमजुरीस गेल्यानंतर रविवारी सकाळी ८.३० ते ९.३० या कालावधीत अजय हा झोपडीतून बेपत्ता झाला होता. मुलाला कुणीतरी पळवून नेल्याची तक्रार पालकांनी सोमवारी वरुड पोलिसांत नोंदविली. दरम्यान, ज्या शेतात पंधरे कुटुंब राहते, त्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर श्रीसाईराम वॉशिंग सेंटरच्या बाजूला नादुरुस्त एम.एच.०१ व्ही.ए ४३४९ या क्रमांकाच्या कारमध्ये अजयचा मृतदेह आढळून आला.
असा आहे पोलिसांचा कयास
कार आणि मृत अजयच्या घराचे अंतर हे १०० मीटरचे आहे. घरी कुणी नसल्याने अजय घराबाहेर पडला. खेळता-खेळता तो कारजवळ आला. आत गेल्यावर कारची दारे त्याला उघडता आली नाही. त्यात गुदमरून वा अतितापमानामुळे त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तविली. वैद्यकीय आणि न्यायवैद्यक परीक्षण अहवाल सोमवारपर्यंत येऊ शकतो. त्यानंतर उलगडा होईल, अशी माहिती ठाणेदार दीपक वानखडे यांनी दिली.
पंधरवाड्यापूर्वी झाला होता वाद
मृत अजयची आई ललिता पंधरे आणि आजी रमा चिंचामे यांच्यानुसार, अजय हा १५ दिवसांपूर्वी लोखंड वेचण्यासाठी जवळच्या नाल्याजवळ गेला होता. तेव्हा मुलांमध्ये भांडण झाले होते. यावेळी काही लोकांनी येऊन त्याला मारझोड केली तथा धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे अजयचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.