धामणगाव तालुक्यात डेंग्यूचा डंख, आरोग्य यंत्रणेचा अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 09:09 PM2017-11-08T21:09:01+5:302017-11-08T21:09:31+5:30
धामणगाव रेल्वे : एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना डेंग्यूची लागण झाल्याचे पुढे आल्यानंतर धामणगाव तालुक्याचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे.
धामणगाव रेल्वे : एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना डेंग्यूची लागण झाल्याचे पुढे आल्यानंतर धामणगाव तालुक्याचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. ग्रामपंचायतींच्या अनास्थेमुळे ३५ गावांमध्ये शेणखताचे ढिगारे उपसले गेले नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
तालुक्यातील तळेगाव दशासर येथील गत आठवड्यात अमोल कावळे यांच्या दोन मुलींना डेंग्यूची लागण झाली. यानंतर त्यांचे बंधू नीलेश कावळे यांच्या मुलाच्या रक्तनमुन्यात डेंग्यूचे विषाणू आढळले. यामुळे झाल्याचे दिसले़ त्यामुळे धामणगाव तालुक्यातील आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. ज्या कुटुंबातील व्यक्तींना अनेक दिवसांपासून ताप आहे, अशा रुग्णांची रक्ततपासणी युद्धस्तरावर सुरू आहे. आरोग्य विभाग कार्यमग्न असला तरी ग्रामपंचायतीचे सहकार्य मिळत नसल्याच्या वेदना या विभागातील कर्मचारी व्यक्त करतात. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेणखत गावाबाहेर टाकण्याबाबत ग्रामपंचायत संबंधितांना नोटिसा देते. मात्र यंदा हे शेणखत गावालगतच्या खड्ड्यांमध्येच मुरले असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तळेगाव दशासरसारखी परिस्थिती इतर गावांमध्ये पसरण्यासाठी यामुळे अवधी लागणार नाही, अशी भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे़
दूषित पाण्याकडे दुर्लक्ष
दूषित पाण्याचे नमुने येत असताना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. विस्तार अधिकारी थेट नागपूरहून ये-जा करीत असल्याने दूषित पाण्याबाबत काळजी कोण घेणार, असा सवाल निर्माण झाला आहे. संबंधित कर्मचा-यांची खातेनिहाय चौकशी करून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
तळेगावात स्वच्छता अभियान
तळेगाव दशासरमधील तीन चिमुकल्यांना डेंग्यूची लागण झाल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. सरपंच व ग्रामसचिव जयंत खैर यांनी स्वच्छता मोहिमेला गती दिली आहे. दरम्यान ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळले, त्या भागातील आरोग्य व स्वच्छतेबाबत अद्ययावत माहिती जिप़ सदस्य अनिता मेश्राम दररोज घेत आहे़त. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अशोक लांडगे हे लक्ष ठेवून आहेत.
धामणगाव तालुक्यातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले असून, ज्या व्यक्तीला अनेक दिवसांपासून ताप आहे, अशा व्यक्तींना योग्य उपचारासाठी हलविण्यात येत आहे.
- विजय शेंडे,
तालुका आरोग्य अधिकारी