जिल्ह्याला डेंग्यूचा विळखा,१९ संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 10:53 PM2017-09-08T22:53:15+5:302017-09-08T22:53:56+5:30
महापालिका क्षेत्रातील खासगी रुगणालयांमध्ये डेंग्यूसदृश तापाच्या उपचारार्थ दाखल १९ रूग्णांचे रक्तजल नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका क्षेत्रातील खासगी रुगणालयांमध्ये डेंग्यूसदृश तापाच्या उपचारार्थ दाखल १९ रूग्णांचे रक्तजल नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. शुक्रवारअखेर ११ रक्तजल नमुन्यांचा अहवाल आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला असून त्यापैकी एक रूग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळून आला आहे.
तूर्तास एकच रूग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह असला तरी संशयितांच्या आकडेवारीवरून डेंग्यूसदृश तापाने जिल्ह्याला घातलेला विळखा अधिक घट्ट होत असल्याची दुश्चिन्हे आहेत. विषाणूबाधित एडीस एजिप्टाय डास चावल्याने डेंग्यूचा मानवाला संसर्ग होतो. हा डास दिवसा चावणारा असून तापाचा प्रसार मानव-डास-मानव असा आहे. पुण्यात नोकरी करणाºया स्थानिक कठोरा नाका येथील अक्षय झोपाटे याचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. डेंग्यूसदृश तापाने आजारी असलेल्या १९ रूग्णांचे रक्तजल नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत. शहरातील खासगी रूग्णालयांमध्ये दाखल पाच संशयित डेंग्यू रूग्णांचे रक्तजलनमुने ५ सप्टेंबरला तर ९ रूग्णांचे रक्तजलनमुने ७ सप्टेंबरला हिवताप अधिकाºयांकडे पाठविण्यात आले. डॉ. रोहन काळमेघ, लाईफकेअर हॉस्पिटल, गेट लाईफ हॉस्पिटल, डॉ. राजेश मिसर, डॉ. एन.टी.चांडक, डॉ. राजेंद्र ढोरे, डॉ.अजय डफळे आणि डॉ. सुभाष पाटणकर यांच्या रूग्णालयात हे संशयित रुग्ण दाखल आहेत.
डेंग्यू संशयित रुग्णांमध्ये नारायणनगरमधील दोन कलोतीनगरमधील एक स्वावलंबीनगरमधील एक, प्रशांतनगरमधील चार, अंजनगाव सुर्जीतील एक, विर्शीमधील एक, विजय कॉलनीमधील एक फ्रेजरपुरा येथील एक आणि अचलपूर तालुक्यातील एकलासपूर येथील एका बालिकेचा समावेश आहे.
लहान मुलांना डेंग्यूचा धोका
हा आजार कोणालाही होऊ शकतो. मात्र, प्रामुख्याने लहान मुलांना डेंग्यू संसर्गाचा धोका अधिक असतो.
लक्षणे : डेंग्यूची लक्षणे ही इतर विषाणूजन्य तापासारखीच असतात. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्या मागे दुखणे, अशी लक्षणे आढळतात.
रक्तस्त्रावित डेंग्यू !
‘रक्तस्त्रावित डेंग्यू’ ही या आजाराची गंभीर अवस्था आहे. याची सुरुवात तीव्र तापाने होते तर डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात. सुरुवातीच्या काही दिवसांत याची लक्षणे साध्या डेंग्यू सारखी असतात. क्वचित त्वचेवर पुरळ दिसून येतात. रक्तस्त्रावित डेंग्यू तापाचे निदान अंगावरील दर्शनीय भागावर आलेल्या पुरळांवरुन केले जाऊ शकते.
महापालिका क्षेत्रांतर्गत खासगी रुग्णालयातील १९ संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले. त्यापैकी ११ नमुन्यांचा अहवाल ‘डीएमए’कडे प्राप्त झाला. पैकी एक रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
- सीमा नैताम, एमओएच