डेंग्यूच्या साथरोगाने दिलालपूरवासी भयभीत
By admin | Published: May 27, 2014 11:23 PM2014-05-27T23:23:43+5:302014-05-27T23:23:43+5:30
तालुक्यातील दिलालपूर येथे येथे गेल्या एका आठवड्यापासून डेंग्यू सदृश्य आजाराची साथ सुरू असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. साथीमुळे गावातील अनेक नागरिकांना लागण झाल्याने ब्राह्मणवाडा
चांदूरबाजार : तालुक्यातील दिलालपूर येथे येथे गेल्या एका आठवड्यापासून डेंग्यू सदृश्य आजाराची साथ सुरू असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. साथीमुळे गावातील अनेक नागरिकांना लागण झाल्याने ब्राह्मणवाडा (थडी) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी दिलालपुरात डेरेदाखल आहेत. चांदूरबाजारपासून तीन कि.मी. अंतरावर असणार्या दिलालपुरची लोकसंख्या ४२५ असून जवळपास ५५ घरांची संख्या असलेल्या या टुमदार गावाला वृक्षवेलीने वेढले आहे. चारही बाजूने शेतजमीन असून या गावाला बोअरने पाणीपुरवठा होतो. या गावातील सांडपाणी वाहून नेणार्या नाल्या तुंबल्या आहेत. गावाच्या चारही बाजूंने पूर्णा प्रकल्पाचे कालवे असून गावाजवळील नालीमध्ये कालव्यातील ओव्हर फ्लोचे पाणी नेहमी भरले असते. यामुळे अशा पाण्यावर डासांचा प्रादूर्भाव नेहमी होत असतो. गावात आलेल्या या साथीमुळे प्रशासन खळबळून जागे झाले असून पदाधिकारी व अधिकारी यांनी आपला मोर्चा या गावाकडे वळविला. जि.प. चे आरोग्य सभापती मनोहर सुने यांनी सर्वात अगोदर गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. चांदूरबाजारचे गटविकास अधिकारी तुकाराम टेकाडे आदी अधिकार्यांनी गावात येऊन साथीच्या रोगाची रितसर चौकशी केली. या गावातील अमरावती येथे होप दवाखान्यात भरती असणारे रोहिणी अर्डक यांच्या रिपोर्टवर डेंग्यू पॉझिटीव्ह असल्याचे डॉक्टरांनी लिहिले आहे. तर गावातील रोशन बंडू तायवाडे, पवन राजेंद्र डोंगरे, रोहिणी बापुराव अर्डक, भाकरे, वेणूबाई दाभाडे, अमित बाबुराव भाकरे, दत्ता दिगांबर भाकरे, अलका बंडू तायवाडे व सुरेखा डोंगरे हे सुद्धा वेगवेगळय़ा दवाखान्यामध्ये तापाने भरती होते. ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पाचघरे यांच्या नेतृत्वातील चमू आजारांवर लक्ष ठेवण्यासाठी गावात सध्या तळ ठोकून आहे. गावात साफसफाईची मोहीम सुरू झाली असून सरपंच स्वाती भाकरे व ग्रामसेवक हे जातीने साफसफाईकडे लक्ष ठेवून आहे. तर पदाधिकार्यांनी नाली बांधकाम करण्याचे आश्वासन दिले आहे. (शहर प्रतिनिधी)