दर्यापूर तालुक्यात हजार हेक्टरमधील पिके पाण्यात
By admin | Published: August 11, 2016 12:02 AM2016-08-11T00:02:22+5:302016-08-11T00:02:22+5:30
जुलै-आॅगस्ट महिन्यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील पिकांना जोरदार फटका बसला आहे.
संततधार पावसाचा परिणाम : शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त, दुबार पेरणीचे संकट
दर्यापूर : जुलै-आॅगस्ट महिन्यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील पिकांना जोरदार फटका बसला आहे. पावसामुळे तालुक्यातील सुमारे हजार हेक्टर जमिनीतील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दर्यापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये पिकांची हानी झाली आहे.तुरीचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. यावर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यातही आॅगस्ट महिन्याच्या सुरवातीला संततधार व पाऊस सुरु आहे. परिणामी सखल भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत.
नदी-नाल्यांना पूर आला. याचा फटका तालुक्यातील नदीकाठावरील गावांमधील शेतीला बसला. तालुक्यातील सुमारे ७०० ते ८०० हेक्टरमधील पिकांचे पूर व पावसामुळे नुकसान झाले. खारपाणपट्ट्यात पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने पिके अद्यापही पाण्याखाली आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतात पाणी साचल्याने आंतरमशागत करणे शक्य नाही. जुलै महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला आहे. त्यामुळे तूर, मूग व अन्य पिकांची प्रचंड हानी झाली आहे. तब्बल ६०० हेक्टरमधील पिके पाण्याखाली आहेत.
काही ठिकाणी पुरामुळे पिके खरडून गेली आहेत. तालुक्यात मागील तीन वर्षांपासून पाऊस कमी झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. चालू वर्षात मात्र २ टक्क्याने अधिक पाऊस झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाऊस अधिक आहे.
तालुक्यातील खल्लार सर्कलमधील अकरा गावांमध्ये पंधरा दिवसांपूर्वी वडाळी नाल्याचा बांध फुटल्याने खल्लार, सांगवा, घडा, महिमापूर, उपराई व इतर गावांमधील शेतांमध्ये पाणी शिरल्याने हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. शासनामार्फत ज्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे त्यांचा सर्वे करण्यात आला. परंतु अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने त्यांना तातडीने शासनाकडून मदत अपेक्षित आहे. परिसरातील पीकहानीचे सर्वेक्षण करून तातडीने नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांच्यावतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. परंतु अद्यापही कोणतीच मदत मिळाली नाही, त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. मदतीची मागणी केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)
माझ्या एकूण ५ एकर शेतातील पीक वडाळी नाल्याचा बांध फुटल्याने खरडून गेले. परंतु शासनामार्फत अद्यापही कोणतीच मदत मिळालेली नाही. तातडीने मदत मिळावी.
-राजू कराडे,
शेतकरी
तालुक्यात ज्याठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले, त्याची पाहणी करण्यात आली आहे. पुढील अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
-पी.डी.लंगोटे,
कृषी अधिकारी, अचलपूर