बंद पथदिव्यांमुळे अंधाराचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 10:58 PM2018-05-13T22:58:12+5:302018-05-13T22:58:12+5:30
शहरातील दुभाजकांवरील पथदिवे वर्षभरापासून बंद आहेत. यामुळे मुख्य रस्त्यावर रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याशिवाय अनेक प्रभागातील पथदिवे बंद राहात असून नगर परिषद प्रशासन व सत्ताधाºयांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करीत आहे.
प्रभाकर भगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : शहरातील दुभाजकांवरील पथदिवे वर्षभरापासून बंद आहेत. यामुळे मुख्य रस्त्यावर रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याशिवाय अनेक प्रभागातील पथदिवे बंद राहात असून नगर परिषद प्रशासन व सत्ताधाºयांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करीत आहे.
चांदूर रेल्वे शहराचे सौंदर्यीकरण व्हावे, या दृष्टीने विशेष निधीतून रेल्वे स्टेशन ते सिनेमा चौकापर्यंत दुभाजकावर दोन्ही बाजूने १०५ पथदिवे ४ वर्षांपूर्वी बसविण्यात आले. यामुळे शहर प्रकाशझोतात आले होते. याच मुख्य रस्त्यावरून नागरिकांची सतत वर्दळ सुरू राहते. रात्रीच्या वेळी व पहाटे असंख्य प्रवासी रेल्वेतून उतरत चौकाकडे येत असताना सगळीकडे अंधार पसरलेला असतो. वर्षभरापासून सदर पथदिवे बंद असून ते केवळ शोभेची वस्तू बनली आहेत. शुक्रवारी गाडगेबाबा मार्केट, शिक्षक कॉलनी रोड, रामनगर भागातील अनेक पथदिवे बंद दिसून आले. याशिवाय शहरातील अनेक भागांतील पथदिवे बंद राहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बंद पथदिव्यांबाबत नगर परिषद प्रशासनाचे तसेच सत्ताधाºयांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शहरवासी करीत आहे. त्यामुळे दुभाजकासह संपूर्ण शहरातील पथदिवे कधी दुरूस्त होऊन शहरात प्रकाशझोत पहावयास मिळणार, हे येणारा काळच सांगेल.
मॉर्निंग वॉक करणारे जातात टॉर्च घेऊन
पहाटेदरम्यान अनेक शहरवासी मॉर्निंग वॉककरिता रेल्वे स्टेशनकडे जातात. परंतु पहाटेच्या वेळी बंद पथदिव्यांमुळे चक्क टॉर्च सोबत घेऊन शहरवासीयांना मॉर्निंग वॉकला जाणे भाग पडत आहे.
दोन दिवसांनंतर रमजान महिना प्रारंभ
येत्या २ दिवसांनंतर मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरूवात होणार आहे. या अंधाराच्या साम्राज्यामुळे त्यांनासुध्दा नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याची शक्यता आहे. याचा विचार करून नगर परिषदेने त्वरित पथदिवे सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दुभाजकावरील पथदिव्यांच्या आतील वायरिंंग नादुरूस्त आहे. या संपूर्ण कामाकरिता अंदाजे १० ते १२ लाखांचा निधी अपेक्षित आहे. निधी उपलब्धीसाठी प्रयत्न सुरू आहे.
- रवींद्र पाटील, मुख्याधिकारी, नगर परिषद