डेटा चोरीचा फंडा पोतदारकडून 'व्हेरिफाय'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:45 AM2017-12-05T00:45:36+5:302017-12-05T00:45:56+5:30
एटीएम क्लोनिंग प्रकरणातील आरोपी परितोष पोतदार याने एटीएममधून डेटा चोरण्यासाठी वापरलेला फंडा पोलिसांनी जाणून घेतला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : एटीएम क्लोनिंग प्रकरणातील आरोपी परितोष पोतदार याने एटीएममधून डेटा चोरण्यासाठी वापरलेला फंडा पोलिसांनी जाणून घेतला. त्याला सोमवारी शहरातील विविध एटीएममध्ये फिरवून डेटा चोरीच्या पद्धतीची माहिती पोलिसांनी 'व्हेरिफाय' केली.
परितोषला न्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, त्याने शहरातील ज्या-ज्या एटीएममधून बँक खातेदारांचा डेटा चोरला, त्या-त्या एटीएमची तपासणी पोलिसांनी केली. बँक खात्यातून परस्पर पैसे चोरणाºया आंतरराष्ट्रीय टोळीतील परितोष पोतदारला गुन्हे शाखा व सायबर सेलच्या पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. या टोळीतील मुख्य सूत्रधार व त्याचे साथीदार दिल्लीत बसून देशभरातील अनेक राज्यांतील नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे उडवायचे. अमरावतीमधील एसबीआय बँक खातेदार एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले की, त्यांच्या मागेच उभे राहून आरोपी पोतदार कार्डचा नंबर मिळवायचा. त्याने तशी कबुली पोलिसांना दिली. मात्र, त्याचे प्रात्यक्षिक व संपूर्ण पद्धती पोलिसांनी पोतदारला एटीएममध्ये नेऊन जाणून घेतली. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे, पोलीस हवालदार प्रकाश जगताप, सुभाष पाटील, उमेश कापडे यांनी सोमवारी दुपारी पोतदारला शहरातील राठीनगर, शाम चौक, बडनेरा या तीन ठिकाणच्या एटीएमवर नेले होते. त्याने खातेदारांचा डेटा चोरण्यासाठी काय व कसे काम काम केले, हे पोलिसांना दाखविले.
पोतदार दाम्पत्याचे खाते गोठविण्यासाठी बँकेला पत्र
पोलीस चौकशीत पोतदारचे तीन व त्याच्या पत्नीचे दोन खाते अॅक्सीस बँकेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. संबंधित बँक खाते गोठविण्यासाठी पोलिसांनी बँकेला पत्राद्वारे कळविले आहे.
पोलीस ओडिशाला रवाना
एसबीआय बँक खात्यातून रक्कम चोरणारी ही टोळी ओडिशा येथील असून, त्यांनी दिल्लीतून कारस्थानाची सर्व सूत्रे हलविली. या टोळीतील एका आरोपीला अमरावती, तर दोन आरोपींना चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या टोळीत आणखी तीन सदस्य मोकाट असून, त्यांच्या शोधात गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांच्या पोलीस पथक सोमवारी सकाळी ओडिशाला रवाना झाले आहे.