‘रोहयो’मध्ये राबतात मृत व्यक्ती
By admin | Published: March 29, 2015 12:34 AM2015-03-29T00:34:11+5:302015-03-29T00:34:11+5:30
शासनाने ग्रामीण भागातील मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या हेतुने सुरू केलेली रोजगार हमी योजना भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे.
श्रीकृष्ण मालपे नेरपिंगळाई
शासनाने ग्रामीण भागातील मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या हेतुने सुरू केलेली रोजगार हमी योजना भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संगनमताने या योजनेला सुरूंग लागला आहे. येथे रोहयोतील एका मजूर महिलेचा मृत्यू झाल्यानंतर चक्क एक वर्षानंतर तिने रोहयोत काम केल्याची व मजुरी घेतल्याची नोंद आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुनीता संजय रेवस्कर नामक महिला रोहयोच्या कामावर कार्यरत होती. या महिलेचा २८ फेब्रुवारी २०१२ रोजी मृत्यू झाल्यानंतर पंचायत समितीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम ५ एप्रिल २०१२ रोजी सुरू झाले. या कामावर सदर महिला २३-मार्च -१३ ते २९-मार्च-१३ व ५-एप्रिल-१३ ते ११-एप्रिल -१३ पर्यंत कामावर हजर असल्याची नोंद हजेरी बूकात होती. कामाचा मोबदला म्हणून १२६७ रुपये व ५२७ रुपये मजुरी घेतल्याची नोंद आहे. सदर महिलेचा जॉब कार्ड क्र. एम.एच. २४-००२-५२३-००१/२३३३ असून ८३४५६४८ व ११७ या हजेरी क्रमांकावर तिने काम केल्याची नोंद आहे. त्यानंतर पुन्हा २३-४-२०१४ रोजी पुन्हा काम मागितल्याची सुद्धा नोंद आहे. एखादी व्यक्ती जीवंत किंवा मृत असल्याचे दाखले ग्रामसेवक, सरपंच देत असतात. रोजगार हमी योजनेवर काम करणारे मजूर जिवंत आहेत किंवा नाही याची शहानिशा न करता हजेरी मंजूर करण्यात आलेली आहे. मजुरांची हजेरी घेण्याचे काम रोजगार सेवकाचे असते परंतु कुणालाही याबाबतीत चौकशी करावीशी वाटली नाही. शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी असणाऱ्या या योजनेमध्ये मृत व्यक्तींच्या नावाने काम दाखवून पैसे काढल्या जात असतील तर जिवंत व्यक्तीच्या नावाने मोठा भ्रष्टाचार होत असला पाहिजे.
या प्रकरणाबरोबरच २०१३-१४ मध्ये झालेल्या मंगरुळ-भिलापूर पांधण रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. नेरपिंगळाई ते नामडोल या रस्त्यावर लावण्यात आलेल्या वृक्षापैकी एकही वृक्ष जिवंत नाही. याही योजनेवर मोठ्या प्रमाणात खर्च दाखविण्यात आला आहे. तसेच सावरखेड ते वाघोली पांधण रस्ता (आर्थिक वर्ष २०१२-१३) या कामावर आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला असून काम निकृष्ठ दर्जाचे आहे.
प्रकरणांची योग्य चौकशी, व्हावी याकरिता ४ मार्च २०१५ रोजी तक्रार निवारण प्राधिकारी भेंडे यांचेकडे लेखी तक्रार दिली असून एक महिना उलटूनही चौकशी झाली नाही. तरी या प्रकरणाची त्वरीत चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कार्यवाही व्हावी, अशी मागणी तक्रारकर्ते ज्ञानेश्वर बरडे यांनी केली आहे. रोहयोच्या कामात अशा प्रकारे भ्रष्टाचार होत असल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे.