डेडलाईन संपली २७ टक्केच वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 12:20 AM2017-10-08T00:20:53+5:302017-10-08T00:21:05+5:30
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १,५९२ कोटी ५४ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे लक्ष्यांक असताना ३० सप्टेंबर या ‘डेडलाईन’पूर्वी केवळ ४१ हजार ११३ शेतकºयांना ४२६ कोटी ९२ लाखांचे वाटप केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १,५९२ कोटी ५४ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे लक्ष्यांक असताना ३० सप्टेंबर या ‘डेडलाईन’पूर्वी केवळ ४१ हजार ११३ शेतकºयांना ४२६ कोटी ९२ लाखांचे वाटप केले. ही केवळ २७ टक्केवारी आहे. अद्याप १,१६६ कोटींचे कर्जवाटप बाकी आहे. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कर्जमाफीच्या घोळात बँकांनी शेतकºयांना माघारी धाडत खरिपाचे कर्जवाटप गुडांळल्याचे वास्तव आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात दोन लाख ४१ हजार ४१० शेतकरी पात्र होते. हे नियमित व नवीन खातेदार वगळता उर्वरित शेतकरी थकबाकीदार असल्याने त्यांना बँकांनी कर्ज नाकारले. मात्र जे शेतकरी पात्र होते त्यांनाही बँकांनी कर्ज दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षी बँकांना यंदापेक्षा अधिक २,१४५ कोटी ६८ लाखांचे लक्ष्यांक असताना एक लाख ६५ हजार ६३७ शेतकºयांना १,४१२ कोटी ८२ लाख रूपयांचे कर्जवाटप केले. ही ६६ टक्केवारी आहे. यंदा मात्र हंगामाच्या सुरूवातीपासूनच कर्जवाटपास बँकांची नकारघंटा होती. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे.
राज्य शासनाद्वारा यंदा जूनअखेर शेतकºयांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकांचा कर्ज वाटपाचा टक्का माघारला. एकीकडे शेतकºयांना बँकाद्वांरा खरिपाचे कर्जवाटप करण्यात आलेले नाही, तर दुसरीकडे तीन महिन्यांपासून कर्जमाफीचा घोळ अजून निस्तरला नाही. अजूनही २०० वर गावांत चावडीवाचन झालेले नाही. त्यामुळे शेतकºयांची कर्जमाफी यंदाच्या वर्षात होणार की नाही, याबाबत शंकाच आहे. मात्र शासनस्तरावरील घोळाचा नेमका फायदा घेत बँकांनी खरिपाच्या अंतिम मुदतीपर्यंत केवळ २७ टक्क्यांवरच वाटप गुंडाळले. या बँकांवर शासन कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
असे आहे खरिपासाठी बँकांचे कर्जवाटप
यंदाच्या खरिपासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना १,०६२ कोटी ६ लाख रूपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना प्रत्यक्षात २४६ कोटी ३६ लाख रूपयांचे कर्जवाटप केले, ही २३ टक्केवारी आहे. ग्रामीण बँकांना १३ कोटी ८८ लाख रूपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना प्रत्यक्षात दोन कोटी ८० लाख रूपयांचे कर्जवाटप केले, ही २० टक्केवारी आहे. जिल्हा बँकेला ५१६ कोटी ६० लाख रूपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना १७७ कोटी २३ लाख रूपयांचे कर्ज वाटप केलेले आहेत, ही ३४ टक्केवारी आहे.