आरटीईचे प्रवेशासाठी ८ मे पर्यत डेडलाईन, शिक्षण संचालनालयाचा निर्णय
By जितेंद्र दखने | Published: April 24, 2023 05:13 PM2023-04-24T17:13:39+5:302023-04-24T17:14:15+5:30
पालकांना दिलासा
अमरावती : आरटीई प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यासाठी पालकांची धावपळ सध्या सुरू आहे. परंतु, पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे पालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते.परिणामी पालकांचीही धाकधुक वाढली होती. या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासंदर्भात कोणतीही काळजी करू नये. त्यांना प्रवेशासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या संचालकांनी स्पष्ट केले होते.
त्यानुसार आता आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली असून आता आरटीईचे प्रवेश ८ मे पर्यत घेता येणार आहे. यासंदर्भात साेमवार २४ एप्रिल रोजी प्राथमिक शिक्षण संचालक यांनी आदेश जारी केले आहेत.यामुळे पालकांनाही दिलासा मिळाला आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अन्वये दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. त्यानुसार, २०२३-२४ या शैक्षणिक वषार्साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ऑनलाइन सोडत ५ एप्रिलला निवड झालेल्या पालकांनी १३ ते २५ एप्रिल या कालावधीत प्रवेश निश्चित करावा, असे सांगण्यात आले होते. मात्र, सर्व्हर डाउन असल्यामुळे दिलेल्या मुदतीत बालकांचे प्रवेश निश्चित करता आले नाही. त्यामुळे बालकांचे प्रवेश आता ८ मे पर्यत निश्चित करता येणार आहेत. प्रक्रियेला प्राथमिक शिक्षण संचालकांच्या या निर्णयामुळे पालकांनाही दिलासा मिळाला आहे.
आरटीई प्रवेशाकरीता १३ ते २५ एप्रिल पर्यत मुदत दिली होती. मात्र तांत्रिक अडचणीमुळे बालकांचे प्रवेश या कालावधीत निश्चित करता आले नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालकांनी आता प्रवेशाकरीता ८ मे पर्यत मुदतवाढ दिली आहे. पालकांनी दिलेल्या मुदतीत आपल्या पाल्यांचे प्रवेश नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करून निश्चित करून घ्यावे.
- प्रिया देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी