नरखेड रेल्वे पुलासाठी ‘डेडलाईन’
By Admin | Published: October 31, 2015 01:04 AM2015-10-31T01:04:17+5:302015-10-31T01:04:17+5:30
बडनेरा-अमरावती राज्य महामार्गावर नरखेड रेल्वे मार्गावर निर्माणाधीन पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे.
कामाला गती : ३१ मार्चपूर्वी बांधकाम पूर्ण करण्याचा सूचना
अमरावती : बडनेरा-अमरावती राज्य महामार्गावर नरखेड रेल्वे मार्गावर निर्माणाधीन पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे. ३१ मार्चपूर्वी रेल्वे पुलाचे बांधकाम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
२२ कोटी रुपयांच्या खर्चातून नरखेड रेल्वे मार्गावर हा पूल निर्माण केला जात आहे. पुलाचे ७० टक्के बांधकाम पूर्ण झाले असले तरी या पुलाच्या अर्धवट कामामुळे बडनेरा रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण मात्र पूर्ण झालेले नाही. ‘एसएमएस’ या कन्स्ट्रक्शन कंपनीने नरखेड रेल्वे मार्गाच्या बांधकामाचे कंत्राट घेतले आहे. मध्यंतरी निधीअभावी पुलाचे बांधकाम रखडले होते. मात्र, रेल्वे मंत्रालयाने निधीची अडचण दूर करताच पुन्हा बांधकामाला गती मिळाली आहे. परंतु हा पूल ३१ मार्च २०१६ पर्यंत पूर्ण होऊन यावरुन वाहतूक सुरू व्हावी, यासाठी खा. आनंदराव अडसूळ यांनी दिल्ली येथे रेल्वे बोर्डात बैठक घेतली होती. या बैठकीत खा. अडसुळांनी पूल निर्मितीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.
काँक्रीटीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाली आहेत. डांबरीकरणाची कामे पूर्ण व्हायची आहेत. पुलाचे बांधकाम पूर्ण होताच डांबरीकरणाची कामे हाती घेतली जातील. ३१ मार्च २०१६ पर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना धडकल्या असतानाच कंत्राटदारांनी अद्ययावत यंत्रसामग्री, कुशल मनुष्यबळाचा वापर करुन रेल्वे पुलाच्या बांधकामाला गती दिली आहे. रात्रंदिवस पुलाचे बांधकाम सुरू असल्याचे दिसून येत आहे. या पुलाच्या निर्मितीत आता निधीची अडचण नसल्याने मागील चार महिन्यांपासून बांधकाम गतीने सुरू आहे. किरकोळ कामे पूर्ण करण्यासही प्राधान्य दिले जात आहे. कामाची सध्याची गती पाहता मार्च अखेरपर्यंत हा पूल पूर्ण होण्याचे संकेत आहेत. (प्रतिनिधी)