‘डीन’प्रकरणी विद्यापीठाची प्रतिमा मलिन
By admin | Published: January 26, 2017 12:34 AM2017-01-26T00:34:54+5:302017-01-26T00:34:54+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण विद्याशाखेचे अधिष्ठाता (डीन) एम.एच.लकडे यांच्या गैरकारभाराने विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाली आहे.
११ विद्यार्थ्यांनी सोडले ‘एमपीएड’ : राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेचा आदेश गुंडाळला
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण विद्याशाखेचे अधिष्ठाता (डीन) एम.एच.लकडे यांच्या गैरकारभाराने विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांच्या हेकेखोरीमुळे ११ विद्यार्थ्यांना ‘एमपीएड’ अभ्यासक्रम प्रवेश अर्ध्यावरच सोडून जाण्याचा प्रसंग उद्भवल्याची धक्कादायक माहिती आहे.
तत्कालीन कुलगुरु मोहन खेडकर यांच्या ‘चांडाल चौकडी’ने ‘डीन’ पदी आरूढ होण्यासाठी लकडे यांना पाठीशी घातल्याची माहिती आता समोर आली आहे. लकडे हे प्राचार्य नाहीत, पीएचडी नाहीत, विद्यापीठाच्या विभागाचे प्रमुखही नाहीत, तरीही शिक्षण विद्याशाखा ‘डीन’पदी नियुक्ती करताना काय राजकारण झाले, याचा विद्यमान कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी सखोल अभ्यास केला तर त्यांच्या निदर्शनास अनेक आश्चर्यकारक बाबी समोर येतील, हे वास्तव आहे. विद्यापीठ हे शिक्षणाचे पवित्रक्षेत्र असताना ‘आपला माणूस’ म्हणून एम. एच.लकडे यांची ‘डीन’पदी नियुक्ती करताना स्थायी समितीने ते मान्यता कशाच्या आधारे केले, हे चौकशी अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेने १६ फेब्रुवारी २०१५ रोजी शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमात बदल करण्याचे आदेश दिले असताना लकडे यांनी हे आदेश मानले नाहीत. बीपीएड, बीएड व एमएडमध्ये जुन्याच पद्धतीने अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले. त्यामुळे शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. एवढेच नव्हे तर विद्यापीठात एमपीएड अभ्यासक्रमाला असलेल्या ३० पैकी ११ विद्यार्थ्यांना अर्ध्यावरच शिक्षण सोडण्याची वेळ आली.
१९ डिसेंबर २०१५ रोजी एमपीएडच्या अन्यायग्रस्त २५ विद्यार्थ्यांनी तत्कालीन कुलगुरु मोहन खेडकर यांच्याकडे धाव घेतली. पंरतु ‘डीन’पदी कार्यरत लकडे यांच्याविरुद्ध मोहन खेडकरांनी कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान या अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी पोलिसांत धाव घेतली. मात्र, तत्कालीन कुलगुरु मोहन खेडकर यांनी पोलिसांना खोटी माहिती देऊन हे प्रकरण ‘मॅनेज’ केले होते, हे विशेष. भोपाळ येथील एनसीटीईने दिलेल्या आदेशानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एमपीएडकरिता नवीन अभ्यासक्रम सुरु करणार, असे प्रतिज्ञापत्र ८ जून २०१५ रोजी तत्कालीन कुलसचिव अशोक चव्हाण यांनी सादर केले होते. मात्र एमपीएडसाठी नवीन अभ्यासक्रम ‘डीन’ एम.एच.लकडे यांच्या नकारात्मक भूमिकेने सुरु करता आले नाही. त्यामुळे सन २०१५-२०१६ या एमपीएड शैक्षणिक अभ्यासक्रमात राष्ट्रीय शिक्षा परिषदेने लागू केलेला नवीन अभ्यासक्रम बंधनकारक असताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने वेगळाच अभ्यासक्रम शिकविला. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. विद्यापीठात शारीररिक शिक्षण पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे काही खरे नसल्याचे बघून चक्क ११ विद्यार्थी मधेच अभ्यासक्रम सोडून गेलेत. या सर्व बाबी ‘डीन’ लकडे यांच्या कार्यप्रणालीने विद्यापीठाच्या वाट्याला आल्या आहेत.