वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील १३ बिबटांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 05:41 PM2018-06-14T17:41:10+5:302018-06-14T17:41:10+5:30
वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात विहिरीत व रस्ता अपघातात आतापर्यंत १३ बिबटांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. केवळ एका बिबटाला विहिरीतून सुखरूप बचावण्यात वनविभागाला यश आहे, हे वास्तव आहे.
- अमोल कोहळे
पोहरा बंदी (अमरावती) : वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात विहिरीत व रस्ता अपघातात आतापर्यंत १३ बिबटांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. केवळ एका बिबटाला विहिरीतून सुखरूप बचावण्यात वनविभागाला यश आहे, हे वास्तव आहे.
वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत वाघ,बिबटांसह अन्य वन्यप्राणी व विविध औषधीयुक्त वनस्पती ही अमरावती जिल्ह्याला निसर्गाची देण आहे. या जंगलात तृणभक्षी प्राण्यांसह इतर वन्यप्राण्यांची संख्या अधिक असल्याने हिंंस्त्र प्राण्यांनादेखील भक्ष्य टिपणे सहज शक्य होते. तसेच पाणवठे व इतर अनुकुलतेमुळे हा परिसर बिबटांसाठी पोषक असल्याने बिबटांची संख्या दिवसेंदिवस वाढत मात्र, जंगलातून होत असलेली वाहतूक व उघड्या बेवारस विहिरी त्यांच्यासाठी शाप ठरू लागले आहे. जंगलाचा राजा म्हटल्या जाणाºया वाघ व त्यांच्या अतर प्रजातींची संख्या देशात फार कमी झाली आहे. हे वन्यप्राणी केवळ कागदापुरते मर्यादित राहू नये, साठी वन्यप्राण्यांच्या संरक्षणार्थ वनविभागासह शासनाने कायदा अंमलात आणला आहे. त्यामुळे वन्यप्राणांना सहजतेने संपविण्याची कुणी हिंमत करीत नसले तरी त्यांचा होणारा अकाली मृत्यू ही चिंतेची बाब आहे.
इतर ठिकाणचे हिस्त्र प्राण्यांचे स्थलांतरण
वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचे संरक्षण नीट होत असून, येथील वातावरण हिंस्त्र प्राण्यांसाठी अनुकुल असल्याने या भागात स्थलांतरित केलेले वाघ (नवाब व वाघीण) तसेच आदी चंद्रपूर बल्लारशाच्या जंगलातील वन्यप्राणी स्थलांतरित करण्यात आले होते. त्यांना येथील वातावरण सूट झाल्याने ते अनेक वर्षे येथे वास्तव्यास राहिले. त्यांना पुन्हा पूर्वक्षेत्रात नेऊन सोडल्यावर ते परत या भागात शिरल्याच्या घटना अधोरेखित झाल्या आहेत. तसेच कु-हा परिसरातील एका शेतातील उघड्या विहिरीत बकरीची शिकार करताना एक बिबट विहिरीत पडला होता. त्याला वनकर्मचा-यांनी अथक प्रयत्नाने पिंज-यात कैद करून वैद्यकीय तपासणीअंती पुन्हा जंगलात सोडले होते. त्याच एका बिबटाला संकटातून वाचविण्यात वनकर्मचा-यांना यश आले.
असे दगावले १३ बिबट
चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील कु-हा शिवारातील एका शेतातील विहिरीत पडून बिबट दगावला. अडीच वर्षीय मादी बिबट मार्डी परिसरात बिटमध्ये मृतावस्थेत आढळली. पाथरगाव बिट परिसरातील एका शेतात बिबटाचा मृत्यू झाला. तिवसा परिसरातील तारेच्या कुंपणात अडकून बिबटाचा मृत्यू झाला. शेंदूरजना खुर्द परिसरात एका शेतात चार वर्षीय बिबटाचा मृत्यू झाला. वाढोणा परिसरात एका शेताच्या विहिरीत बिबटाचा मृत्यू. चिरोडी जंगलात एका साडेचार वर्षीय बिबटाचा मृत्यू झाला. चिरोडी जंगलालगतच्या एका वाडीत बिबट मृतावस्थेत आढळून आला.
वडाळी वनपरिक्षेत्रातील भवानी तलावा परिसरात बिबटाचा मृत्यू झाला. हायवेवर अपघातात एका बिबटाचा मृत्यू झाला. वैष्णवदेवी मंदिराजवळ सात महिन्यांचे मादी बिबट अपघातात दगावले. धबधबा परिसरात अपघातात एका बिबट्याचा मृत्यू झाला. वाघामाई परिसरात अपघातादरम्यान एक बिबट दगावला.