जिवंतपणीच ‘ते’ भोगताहेत मरणयातना!
By admin | Published: January 21, 2016 12:35 AM2016-01-21T00:35:39+5:302016-01-21T00:35:39+5:30
‘जाताना इतके मजला सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’ जीवनाच्या खडतरपणाला अधोरेखित करून जगण्यापेक्षा मरणेच सोपे, हे हृदयाला भिडणाऱ्या शब्दांत सांगणारी गजलकार सुरेश भट..
लोकमत विशेष
वैभव बाबरेकर अमरावती
‘जाताना इतके मजला सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’ जीवनाच्या खडतरपणाला अधोरेखित करून जगण्यापेक्षा मरणेच सोपे, हे हृदयाला भिडणाऱ्या शब्दांत सांगणारी गजलकार सुरेश भट यांच्या प्रसिध्द गझलेच्या या ओळी आहेत. शहरातील अनेक निराधार वृध्द रस्त्याच्या कडेला केविलवाणे जिणे जगताना अक्षरश: मरण मागत आहेत. जीवंतपणी भोगाव्या लागणाऱ्या मरणयातनांच्या तुलनेत प्रत्यक्ष मरण आलेले काय वाईट? असे आर्जव त्यांच्या डोळ्यांत दिसते.
इर्विन चौकातील परिचर्या वसतिगृहासमोरील फूटपाथवर नजर गेली की कुठल्याही संवेदनशील माणसाचे मन गलबलून येतेच. उघड्यावर ऊन, पाऊ, थंडीचा मारा सोसत, घाणीत लिडबिडलेल्या अवस्थेतील हे निराधार मरणाची प्रतीक्षा करीत आहेत. त्यांचा कुणीही वाली नाही.
स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू असताना या निराधार वृध्दांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी कोणाची, हा रटाळ प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय. शहरात शेकडो निराधार नागरिक आहेत. त्यातील वृध्दांची अक्षरश: फरफट सुरू आहे. शहरातील रिकामे फूटपाथ, पुलाखालची आडोशाची जागा मिळवून तिथेच मरण येईपर्यंत ते राहतात. या निराधारांसाठी प्रशासनासह समाजसेवी संस्थांनी पुढे यायला हवे. पण, अशा निराधारांच्या पुनर्वसनासाठी या संस्थाही फारशा उत्सुक दिसून येत नाहीत.
इर्विनसमोरील परिचर्या वसतिगृहाच्या फूटपाथवर पूर्वी चार ते पाच वृध्द भिकारी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना भीक मागून कसेबसे पोट भरत आहेत. दैनंदिन गरजांसाठी उठून दुसरीकडे जाण्याची त्यांच्या शरीरात ताकद नसल्याने तेथेच घाण करतात. याच घाणीत लिडबिडत पडून राहण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय नाही. पावसात ते भिजतात, उन्हात करपतात आणि थंडीत कुडकुडतात. त्यांच्या आसपासच्या परिसरात कोणी दुर्गंधीमुळे उभाही राहू शकत नाही. मरणप्राय जीणे जगत असताना हजारोे लोक त्यांच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकून पुढे निघून जातात. प्रशासनाला आणि कुठल्याही समाजसेवी संस्थेला त्यांच्या पुनर्वसनाची गरज भासत नाही. या सर्वच वृध्दांना औषधोपचाराची गरज आहे.
मात्र, त्यांना आरोग्य सेवा पुरविणारा कोणीच नाही. इर्विन परिसरात एका ठिकाणी अन्नदान केले जाते. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी ते वृध्द वाहनांच्या वर्दळीतून हातपाय घासत रस्ता ओलांडून तेथे जातात. जेवण झाले की पुन्हा हातपाय घासत वसतिगृहाच्या फुटपाथवर येतात. अनोळखी निराधारांसाठी महापालिकेने सोय निवाऱ्याची सोय केली आहे. मात्र, त्यांना फुटपाथवरून उचलून त्या ठिकाणी नेणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अंबानगरीसाठी दुर्दैवाची बाब
अमरावती : खडतर जीवन जगताना या वृध्दांना कोणाचीही मदत मिळत नाही. एखाद्या वाटसरूला दया आली तर त्यांना एखादे ब्लँकेट, गादी किंवा चादर, कधी-कधी एखादा कपडा मिळतो. कुणी दयाळू कधी-कधी ताटभर अन्न देऊन जाते. त्यातच काय तो निर्वाह करायचा. प्रशासन या निराधार वृध्दांचा मृत्यू झाला की मात्र लगेच दखल घेते. त्यांना उचलून शवविच्छेदन गृहात नेले जाते. तीन-चार दिवस नातलगांची प्रतीक्षा करून अंत्यसंस्कारही केले जातात. मात्र, जिवंतपणी नरकयातना भोगणाऱ्या या वृध्दांना जीवंत असताना मदतीचा हात देण्यास कुणीही पुढे येत नाही, हे भयकंर वास्तव आहे. म्हणूनच घाणीत, दुर्गंधीत खितपत पडलेले हे वृध्द मरणाची डोळ्यांत प्राण आणून प्रतीक्षा करताना दिसतात. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सुसंस्कृत अंबानगरीचे हे दुर्देवच काय?