खोकल्याच्या औषधीने मृत्यू; वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये मात्र दुमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:07 PM2018-09-15T22:07:36+5:302018-09-15T22:07:56+5:30
मेडिकल व्यावसायिक प्रफुल्ल कांबळेचा मृत्यू खोकल्याच्या औषधीच्या अतिसेवनाने झाल्याचा प्राथमिक अंदाज शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. तथापि, या औषधीमुळे मृत्यू होत नसल्याचे मत खासगी तज्ज्ञांनी वर्तविले आहे. त्यामुळेच प्रफुल्लच्या मृत्यूच्या निकर्षाबाबत संभ्रम कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेडिकल व्यावसायिक प्रफुल्ल कांबळेचा मृत्यू खोकल्याच्या औषधीच्या अतिसेवनाने झाल्याचा प्राथमिक अंदाज शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. तथापि, या औषधीमुळे मृत्यू होत नसल्याचे मत खासगी तज्ज्ञांनी वर्तविले आहे. त्यामुळेच प्रफुल्लच्या मृत्यूच्या निकर्षाबाबत संभ्रम कायम आहे.
कुऱ्हा येथे मेडिकल स्टोअर थाटणारा प्रफुल्ल कांबळे हा ९ सप्टेंबर रोजी अमरावतीहून गावाकडे परत येत असताना बेपत्ता झाला. १२ सप्टेंबर रोजी त्याचा मृतदेह मार्डी रोडवरील अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलपासून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला आढळला. मृतदेह कुजलेला असल्याकारणाने पोलिसांनी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत जागेवरच शवविच्छेदन केले.
शवविच्छेदनाच्या प्राथमिक अंदाजात अल्कहोलिक औषधीच्या सेवनामुळे उलटी होऊन अन्नकण श्वसन नलिकेत अडकले आणि मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकीय अधिकाºयांनी वर्तविली. दुसरीकडे खासगी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, त्या औषधीत अल्कोहोलचे प्रमाण असते; मात्र जीव जाण्याइतपत ती प्रभावी नसते. वैद्यकीय क्षेत्रातील या भिन्न मतांच्या आधारे पोलीस तपास कोणत्या निकर्षापर्यंत नेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रफुल्लचा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात, ही बाब व्हिसेरा अहवालातून स्पष्ट होईल. तथापि, हत्या की अपघात, अशा दोन्ही बाजूंनी पोलिसांचे तपासकार्य सुरू आहे.
तीन दिवस मृतदेह कोणालाच कसा दिसला नाही?
प्रफुल्लचा मृतदेह ९ ते १२ सप्टेंबर तीन दिवसात रस्त्यावर पडून होता, तर कोणाला कसा दिसला नाही? पोलीस म्हणतात, कोणी लक्ष दिले नसेल. घटनास्थळी प्रफुल्लचा मृतदेह उपडा पडलेला होता. रस्त्यापासून आत काही अंतरावरील झुडुपात त्याचे मोपेड वाहन पडले होते. गवतातून गाडी पुढे जाऊन पडली असती, तर गवत दबलेले असते, मात्र, अशाप्रकाराची स्थिती घटनास्थळी नव्हती. त्यामुळे प्रफुल्लचा मृतदेह अलगद कोणी तरी तेथे आणून टाकला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सखोल तपास केला जावा, अशी मागणी होत आहे.
ड्राय कफसाठी उपयोगी पडणाऱ्या औषधीचा काही जण नशेसाठी वापर करतात. मात्र, अतिसेवनामुळे जीव घेण्याइतपत ते औषध घातक नाही.
- संजय शेळके, उपाध्यक्ष,
केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असो.
शवविच्छेदनाच्या प्राथमिक अंदाजात मृताच्या शरीरात अल्केहोल आढळले. त्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली गेली. घातपाताच्या अनुषंगानेही तपास सुरूच आहे.
- आसाराम चोरमले,
पोलीस निरीक्षक, फे्रजरपुरा.