‘रतन इंडिया’च्या कृत्रिम तलावात पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू
By admin | Published: May 17, 2017 12:08 AM2017-05-17T00:08:27+5:302017-05-17T00:08:27+5:30
रतन इंडिया पॉवर प्रकल्पासाठी तयार केलेल्याकृत्रिम तलावात बुडून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली.
मंगळवारी मध्यरात्री तणाव : यशोमती ठाकूर यांची घटनास्थळाला भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रतन इंडिया पॉवर प्रकल्पासाठी तयार केलेल्याकृत्रिम तलावात बुडून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. जियाउल रहेमान मोहम्मद सरदार (२९,रा.माहुली जहागीर) असे मृताचे नाव आहे. या घटनेचा कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केल्यामुळे तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती.
घटनेच्या माहितीवरून आमदार यशोमती ठाकूर घटनास्थळी भेट देण्यासाठी गेल्या असता तेथील सुरक्षा रक्षकांनी आत जाण्यास मज्जाव केल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर आ.ठाकूर यांनी घटनास्थळाची पाहणी केली व पारदर्शकतेने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्यात.
जियाउल रहेमान हा कर्मचारी बेपत्ता झाल्याची कुणकूण कर्मचाऱ्यांना लागली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जियाउलचे शोधकार्य सुरू केले. कृत्रिम तलावाजवळ जियाउल याचे बूट व काही साहित्य आढळून आले. त्यामुळे जियाउलचा मृतदेह बाहेर काढण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे केली. याची माहिती मिळताच माहुली जहागीर ठाण्याच्या प्रभारी ठाणेदार दिप्ती ब्राम्हणेंसह पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी मृतदेहाचे शोधकार्य सुरू केला असता रात्री अंधार झाला होता. अन्य कर्मचाऱ्यांनी मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. कंपनीत सुविधा व सुरक्षेचा अभाव असल्यामुळे ही घटना घडल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी आक्रोश करीत कंपनीच्या प्रमुखांवर गुन्हे नोंदविण्याची मागणी रेटून धरली होती. त्यांच्या या मागणीमुळे गोंधळ उडाला आणि तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी सकारात्मक भुमिका दाखविल्यानंतर तणावाची स्थिती निवळली. रात्रीच्या अंधारात मृतदेह काढता येणे शक्य नसल्यामुळे पोलिसांनी गोताखोर किंवा आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधला. काही गोताखोरांना बोलावून मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी पहाटे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
माहुलीच्या सरपंचासह उपसरपंचावर प्राणघातक हल्ला
रतन इंडिया पॉवर प्रकल्पातील अधिकाऱ्यांना बचाव केल्याच्या कारणावरून पाच जणांनी माहुली (जहागीर) येथील सरपंच संजय नागोने व उपसरपंच अब्दुल अन्सार अ. जब्बार यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास माहुलीत घडली. मोहम्मद राजीक मो. ईशाक, मोहम्मद इरशाद मो. इशाक, मो. अस्लम मो. अकबर व अब्दुल शकील अब्दुल रशीद यांनी हा हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळताच माहुली पोलिसांनी तत्काळ जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. पावर प्रकल्पातील कर्मचारी जिआउल रहेमान मोहम्मद सरदार याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
रतन इंडिया पॉवर प्लँटमधील कृत्रिम तलावात बुडून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. पाय घसरून तलावात पडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपासअंती पुढील कारवाई होईल.
- दिप्ती ब्राम्हणे,
प्रभारी पोलीस निरीक्षक, माहुली.